खनिज ट्रस्टमुळे महसूल यंत्रणा अद्ययावत

बलराज पवार
रविवार, 12 मार्च 2017

तस्करांना बसणार चाप - कारवाई करणारी टीम मजबूत करण्यासाठी शासनाचा प्रयत्न

सांगली - वाळू तस्करांवर वचक बसवण्यासाठी महसूल यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. त्यांना अद्ययावत साधने देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. तस्करांकडून कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या प्रकारात अलीकडे वाढ झाली आहे, तसेच महसूल विभागाने जप्त केलेल्या गाड्या पुन्हा पळवून नेण्याचे प्रकारही सर्रास होतात. यातून वाळूतस्कर मोकाट झाल्याचे स्पष्ट होते.

तस्करांना बसणार चाप - कारवाई करणारी टीम मजबूत करण्यासाठी शासनाचा प्रयत्न

सांगली - वाळू तस्करांवर वचक बसवण्यासाठी महसूल यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. त्यांना अद्ययावत साधने देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. तस्करांकडून कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या प्रकारात अलीकडे वाढ झाली आहे, तसेच महसूल विभागाने जप्त केलेल्या गाड्या पुन्हा पळवून नेण्याचे प्रकारही सर्रास होतात. यातून वाळूतस्कर मोकाट झाल्याचे स्पष्ट होते.

त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी महसूल यंत्रणा सक्षम करण्याची गरज भासू लागल्याने सरकारने गौण खनिज ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील पहिला असा ट्रस्ट सांगलीत झाला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत झालेल्या बैठकीत गौण खनिज ट्रस्ट करण्याचा निर्णय घेतला. 

कडेगाव तालुक्‍यात नायब तहसीलदारावर गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर महसूलची पथके अद्ययावत करण्याबाबत चर्चा झाली. त्यासाठी निधीची गरज पडणार असल्याने हा निधी गौण खनिजमधून मिळणाऱ्या रॉयल्टीतूनच घेण्याबाबत निर्णय झाला.

प्रत्येक जिल्ह्यात गौण खनिज मिळणाऱ्या निधीतून काही टक्के राखीव निधी ठेवून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिज ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यासाठी असा ट्रस्ट मंजूर झाला. गौण खनिज निधीतून शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नातून सुमारे दहा टक्के निधी ट्रस्टला देण्यात येईल. सांगलीच्या ट्रस्टला सुमारे ८ ते ९ कोटी निधी मिळेल. यातून महसूल यंत्रणेला अद्ययावत व सुसज्ज साधनसामग्री पुरवण्यासाठी राखीव ठेवण्यात येतील. यातून प्रत्येक तालुक्‍याला वाहन, जॅमर व अन्य अद्ययावत साधने देण्यात येतील. या माध्यमातून वाळू तस्करांवर कारवाई करणारी टीम मजबूत करण्याचा  प्रयत्न आहे.

मोका लावण्यास भीती कुणाची?
वाळू तस्करांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर हल्ले केल्यास त्यांना मोका लावण्याचा निर्णय शासनाने घेतला. महसूलमंत्र्यांनीही त्याचा सांगलीत पुनरुच्चार केला. अशा २७ जणांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले; मग मोका लावण्यात अडचण कुणाची? 

ठेका सोडून वाळूचा बेकायदा उपसा करण्याचे धाडस तस्कर करत आहेत ते कुणाच्या जिवावर हे वेगळे सांगण्याची गरज नाही; पण कुणी धाडस करून हा उपसा रोखण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यांच्या जिवावर बेतण्याचे प्रसंगही उद्‌भवले आहेत.

पोलिसांना सोबत न घेता कारवाई का?
वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सोबत घेण्याच्या सूचना आहेत, मात्र त्यांना सोबतीला न घेता महसूल पथक कारवाईचे धाडस का करते? या प्रश्‍नाचे उत्तर अनेक कर्मचारी खासगीत ‘वाटणी’त भागीदार नको म्हणून... असे देतात. आता महसूलमंत्र्यांनी निवृत्त सैनिकांचे पथक करून त्यांना महसूलच्या पथकासोबत देण्याची ‘आयडिया’ आणली; मात्र जे महसूल कर्मचारी पोलिसांना सोबत घेत नाहीत ते या पथकाला दाद देणार का?

वाळू तस्करी, त्याला मिळणारा आशीर्वाद आणि त्यातून मिळणाऱ्या मलिद्यातील भागीदार या सर्वांशी निगडित हा ‘जिव्हाळ्याचा’ प्रश्‍न आहे. तो महसूल यंत्रणा बळकट करून सुटेल ही आशा भाबडी आहे. त्यासाठी कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासारखे अधिकारी हवेत, तरच ही तस्करी रोखली जाऊ शकते. अन्यथा...

शासनाने गौण खनिज ट्रस्टला कालच परवानगी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील गौण खनिजाच्या  निधीतून दहा टक्के रक्कम ट्रस्टला मिळेल. त्याचा  उपयोग विकास कामांना तसेच वाळूची तस्करी रोखण्यासाठी अत्याधुनिक साधने घेण्यास होईल.  त्यामुळे वाळू तस्करांवर तातडीने कारवाई करण्यासाठी त्याचा फायदा होईल. या ट्रस्टवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. त्यामुळे सक्षमपणे काम करता येईल.
- संजयसिंग चव्हाण, अपर जिल्हाधिकारी, सांगली.
 

तस्करांवर वचक बसेल?
गौण खनिज ट्रस्टमधून निधी बाजूला काढून महसूल यंत्रणा बळकट करण्याचा महसूल विभागाचा विचार आहे; मात्र यामुळे तस्करांवर वचक बसेल अशी भाबडी आशा करणे चुकीचे आहे. महसूलचे अधिकारी, कर्मचारी चोरटी वाळू वाहतूक पकडतात. त्या वेळी गाड्या ताब्यात घेऊन त्या पोलिस ठाण्याच्या आवारात अथवा महसूलच्या आवारात लावल्या जातात. मात्र, याच गाड्या नंतर तस्करांनी पळवून नेल्याच्याही घटना घडल्या. त्या कशा? त्यांना कुणाची अंतर्गत साथ नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शिवाय तस्करांची हल्ले करण्यापर्यंत मजल जाते कशी? त्यांना कुठून येते हे बळ? या साऱ्या बाबींची उत्तरे महसूल आणि तस्कर या दोघांनाही माहिती आहेत.

कोरड्या नद्यांतून वाळू तस्करी
ठेकेदारांनी वाळू प्लॉटच्या लिलावाकडे पाठ फिरवली आणि सरळ तस्करी करण्याकडेच मोर्चा वळवला. जिल्ह्यातील कृष्णा, येरळा, अग्रणी, बोर या कोरड्या पडलेल्या नद्यांच्या पात्रातील वाळूचा बेसुमार उपसा करून तस्करी सुरू आहे. काही महिन्यांत वाळूचे अवैध उत्खनन आणि चोरटी वाहतूक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 

Web Title: revenue system modern by mineral trust