उलटा धबधबा पाहण्यास पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

तारळे - गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच पुणे, मुंबई वरूनही पर्यटक येथे येत आहेत. दिवसेंदिवस या धबधब्याची प्रसिद्धी वाढत आहे.

तारळे-पाटण रोडवर असणारे सडावाघापूर हे छोटेसे गाव. पाचगणीच्या धर्तीवरील विस्तीर्ण पठार, धुक्‍यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्‍क्‍या, दाट धुके, धुक्‍यात हरवलेला रस्ता, थंडगार हवा, सोबत पावसाचा शिडकावा, पाण्याने भरून वाहणारी कोयनामाई, हिरवाईने नटलेले डोंगर, खोल दरी, डोंगर कपारीतून फेसाळणारे धबधबे असे वातावरण असते. पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कड्यावरून खोल दरीत कोसळते. परंतु, वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे त्यातील निम्म्याहून अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते. 

कड्यावरून खाली पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे १०० फुटापर्यंत उलटे पठारावर फेकले जाते. दरीला जवळ करणारे धबधबे पाहण्यापेक्षा हा उलटा धबधबा पाहण्यास अनेक जण पसंती देतात. दररोज पर्यटक येथे दाखल होऊ लागले आहेत. निसर्गाची ही अद्‌भुत किमया पाहण्यासाठी रविवार व सुटीच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळते.

वाऱ्याच्या दाबावरच धबधबा
उलट्या धबधब्याचा अविष्कार हा संपूर्णतः वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळ्यांचे पारणे फेडणारा असा नजारा दृष्टीस पडतो. धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेल्या परिसरामुळे छोट्या-मोठ्या धबधब्यांचा मनसोक्त आनंद ते घेऊ शकतात.

Web Title: Reverse Waterfall Tourist