फलटणच्या "स्मार्टसिटी' वाटचालीत कचराची अडसर

फलटणच्या "स्मार्टसिटी' वाटचालीत कचराची अडसर

फलटण ः शहराची वाटचाल स्वच्छता अभियानासह "स्मार्टसिटी'कडे करण्याच्या प्रयत्नात नगरपालिका विविधांगाने प्रयत्न करत असताना शहरातील सर्व घटकांनी त्याला साथ देणे आवश्‍यक आहे. तथापि रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ व फळ विक्रेते व्यवसायातून निर्माण होणारा कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो जवळपास फेकून देत असल्याने स्वच्छता अभियानातील बक्षीस काही अंतरावर राहात असल्याचे चित्र जाणवत आहे. 
फलटण शहर 2018 पासून स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत असून, यावर्षीही या अभियानात भाग घेऊन स्वच्छतेबाबत नियोजनपूर्वक कामे सुरू केली आहेत. या उपक्रमात "कमिन्स'ने सहकार्य व मदत करण्याची भूमिका घेऊन स्वच्छतेचे कामकाज सुरू केले आहे. दोन वर्ष अभियानातील यश पहिल्यांदा 235 व नंतर 86 क्रमांकाने दूरच राहिले. या पार्श्वभूमीवर यावर्षी पूर्ण तयारीने अभियानात उतरलेल्या शहराने सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत भुयारी गटार योजना राबविली; पण ती आजतागायत कार्यरत होऊ शकली नाही. त्या मागची कारणे विविधांगाने चर्चिली जात असली, तरी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याचे अधिकृत माहिती मिळाली आहे. 
पालिका प्रशासन स्वच्छतेबाबत दखल घेत असताना एसटी बस स्थानक परिसर, गिरवी नाका, लाटकर व्यासपीठ, राममंदिर परिसर आदी ठिकाणी असलेले फळविक्रेत, तसेच खाऊ गल्ली, गिरवी नाका ते संजीवराजेनगर, बस स्थानकासमोरील खाद्यपदार्थ विक्रेते कचरा जवळपासच्या आडोशाला फेकून देतात व सायंकाळी निघून जातात, असे चित्र दिसते आहे. त्यातच कित्येक वेळा काही व्यावसायिक कचरा प्लॅस्टिक पोत्यात भरतात व रात्री विमानतळ, बिरदेवनगर व जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला चारीत फेकून देतात. परिणामी दुर्गंधी पसरते हे चित्र आहे. काही विक्रेते आपला कचरा गिरवी नाक्‍यानजीक असलेल्या वनखात्याच्या कंपाउंडच्या आडोशाला फेकून देऊन निघून जातात. या बाबी पालिका प्रशासनाच्या लक्षात येत नसल्याने कचरा साचून राहतो. 
स्वच्छता अभियान यशस्वी करायचे असेल, तर पालिकेने आडोसा, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यातच शहराच्या हद्दीबाहेर असलेले नागरिकही बऱ्याच वेळा कचरा प्लॅस्टिक पिशवीत भरून रात्री रस्त्यात टाकून देत असल्याचे दिसून येते. यावर पालिका प्रशासनाने लक्ष ठेऊन अशा प्रवृत्ती थोपविल्यास स्वच्छता अभियानातील यश फार दूर राहणार नाही, असे नागरिकांचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com