रिक्षा अधिकृत की बोगस?

प्रवीण जाधव
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सातारा - जिल्ह्यातील बोगस रिक्षा शोधण्याची मोहीम जिल्हा पोलिस दलाकडून राबविण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घेतला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात कागदपत्रांची तपासणी करून सातारा शहरातील रिक्षा व चालकांची माहिती असणारे स्टिकर्स त्या-त्या रिक्षांवर लावण्याचे काम शहर वाहतूक शाखेने सुरू केले आहे.

सातारा - जिल्ह्यातील बोगस रिक्षा शोधण्याची मोहीम जिल्हा पोलिस दलाकडून राबविण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घेतला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात कागदपत्रांची तपासणी करून सातारा शहरातील रिक्षा व चालकांची माहिती असणारे स्टिकर्स त्या-त्या रिक्षांवर लावण्याचे काम शहर वाहतूक शाखेने सुरू केले आहे.

अवैध वाहतुकींवर कारवाई करण्याचे आदेश श्री. देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या ‘क्राइम’च्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरू झालेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोगस रिक्षा शोधण्याची मोहीम पोलिस दलाकडून हाती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या अनेक रिक्षा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसताना रस्त्यावर धावतात. त्यावर असलेल्या चालकाकडेही वाहन चालविण्याचा परवाना व बॅच असतो का, असा प्रश्‍न आहे. अशा वाहनांचे अनेकदा नंबरही चुकीचे असतात. त्यामुळे एखाद्या प्रवाशाला त्रास झाल्यास काय करायचे, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्याचबरोबरच ज्या रिक्षाचालकांनी अधिकृत परमिट घेऊन व्यवसाय सुरू केला आहे, त्यांच्या उत्पन्नावरही मर्यादा येतात. सर्व शासकीय शुल्क भरून व्यवसाय करणाऱ्याला त्रास होऊ नये यासाठी बोगस रिक्षा शोधण्याचे काम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.
बोगस रिक्षा शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व रिक्षांना स्टिकर्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने हे काम केले जाणार आहे. त्यामध्ये रिक्षा व चालकांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत. 

त्यानंतर ही माहिती असलेले स्टिकर्स सर्व रिक्षांना बसविले जाणार आहेत. पोलिस तसेच नागरिकांना चटकन दिसतील अशा ठिकाणी हे स्टिकर्स लावले जाणार आहे. त्यामुळे रिक्षा अधिकृत आहे की बोगस, हे चटकन लक्षात येणार आहे. प्रवाशांनाही त्यामध्ये बिनधास्तपणे प्रवास करता येणार आहे.

जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात सातारा शहरात याची सुरवात करण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेने त्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सातारा शहरातील काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील अन्य शहरांमध्ये तसेच ज्या ठिकाणी रिक्षा आहेत, तेथे याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अवैध व अधिकृत प्रवासी वाहतूक स्पष्ट व्हावी, हाही पोलिसांचा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे कारवाई करताना अवैधबरोबर अधिकृतही भरडले जावू नयेत, अशी अधीक्षक देशमुख यांची भावना आहे.

भाड्यावरही यावे नियंत्रण
उपप्रादेशिक परिवहन विभागाने नुकतेच रिक्षांचे नवीन दरपत्रक जाहीर केले. त्यामध्ये रिक्षा संघटनांची मागणी मान्य झाली. तरीही अनेक रिक्षाचालक मीटरपेक्षा जास्त भाडे आकारताना दिसतात. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची अडवणूक केली जाते. अवाच्या सव्वा भाडे मागितले जाते. त्यामुळे रिक्षाच्या भाडे आकारणीवरही नियंत्रण आणण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

Web Title: Rickshaw Legal or Bogus Traffic Police