मीटर नावाला; भुर्दंड प्रवाशाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सातारा - रिक्षाचालकांच्या मागणीनुसार पहिला टप्पा एक किलोमीटरचा करत त्याला वीस रुपयांचा दर उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंजूर केला, तरीही रिक्षाचालकांची जादा भाडे आकारण्याची खोड अद्याप मोडत नाही. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे झालेल्या वाहतूक बदलाचा आधार घेत प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे मागितले जात आहे.

सातारा - रिक्षाचालकांच्या मागणीनुसार पहिला टप्पा एक किलोमीटरचा करत त्याला वीस रुपयांचा दर उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंजूर केला, तरीही रिक्षाचालकांची जादा भाडे आकारण्याची खोड अद्याप मोडत नाही. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे झालेल्या वाहतूक बदलाचा आधार घेत प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे मागितले जात आहे.

पेट्रोलचे वाढते दर, इन्शुरन्स व पासिंगच्या खर्चातील वाढ या मुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने पहिल्या टप्प्याला वीस रुपयांचे भाडे निश्‍चित करावे तसेच पहिला टप्पा एक किलोमीटरचा करावा, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून रिक्षाचालकांकडून होत होती. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी रिक्षा भाड्याची फेररचना केली. त्यामध्ये रिक्षाचालकांच्या मागणीनुसार वीस रुपये भाडे करण्यात आले, त्याचबरोबर अनेक वर्षांची पहिला टप्पा एक किलोमीटरचा करण्याची मागणीही मान्य करण्यात आली होती. त्यानंतर रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारतील, अशी अपेक्षा होती. रिक्षा संघटनांनीही तेव्हा मीटरप्रमाणेच भाडे आकारावे, असे आवाहन केले होते. मीटरप्रमाणे न चालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती.

भाडे वाढीमुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागले. परंतु, त्यातूनही रिक्षाचालकांचे समाधान होत नाही. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे फिरून जावे लागते. येतानाही लांबचा पल्ला पडतो, अशी कारणे देत मनामानी पद्धतीने भाडे सांगितले जात आहे.

लगाम कोण घालणार?
मुख्य बस स्थानकापासून पोवई नाक्‍यावर यायलाही ५० रुपये भाडे सांगितले जात आहे. या मनमानीला लगाम लावण्याचे काम कोणतीच यंत्रणा करत नाही. त्यामुळे प्रवाशांची परवड होत आहे. पहिल्या टप्प्यालाही आता वीस रुपयांपेक्षा जास्त भाडे सांगितले जात आहे. पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत तातडीने कारवाई व उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

Web Title: Rickshaw Meter Passenger Loss