नगर - मार्चपूर्वी कामे न झाल्याने निधी परत जाण्याचा धोका

संजय काटे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

श्रीगोंदे (नगर) : दलित वस्ती सुधार योजनेतील २०१६-१७ ची मार्चपुर्वी पुर्ण न झालेल्या कामांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०१७ मध्येच त्याबाबतचा आदेश पंचायत समितीला आला होता मात्र त्याची अंमलबजावणीचा न झाल्याने आता जी कामे झाली नाहीत अथवा सुरु आहेत त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. 

श्रीगोंदे (नगर) : दलित वस्ती सुधार योजनेतील २०१६-१७ ची मार्चपुर्वी पुर्ण न झालेल्या कामांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०१७ मध्येच त्याबाबतचा आदेश पंचायत समितीला आला होता मात्र त्याची अंमलबजावणीचा न झाल्याने आता जी कामे झाली नाहीत अथवा सुरु आहेत त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. 

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते, गटारी, समाजमंदीरे बांधकाम अशी महत्वाची कामे होतात. त्यासाठी तालुक्यात मोठा निधी जिल्हा परिषेदच्या माध्यमातून आला आहे. राज्यात अनेक तालुक्यांमध्ये यावर्षी खर्च न झालेला निधी पुढच्यावर्षी त्याच कामांवर खर्च करण्याची प्रथाच पडली होती. त्यामुळे २००८ मध्ये सरकारने दिलेला निधी त्याच वर्षात खर्च करण्याची अट घातली होती. मात्र तीचे पालन होत होते की नाही याबद्दलही सांशकता आहे.

दरम्यान आता मात्र सरकारने फतवा काढून त्याच आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पंचायत समिती व ग्रामपंचायती अडचणीत आल्याचे समजले. श्रीगोंदे पंचायत समितीतून मिळालेल्या माहितीनूसार संपलेल्या आर्थिक वर्षात दलित वस्ती सुधार योजनेच्या दिडशे कामांना मंजूरी होती व ती मार्च २०१८ पुर्वी पुर्ण करायची होती. त्यातील ६५ कामे पुर्ण आहेत तर ३५ कामे सुरु असताना अनेक कामे रद्द झाली आहेत. अनेक कामांचे कार्यारंभ आदेशच मार्च एन्डला निघाल्याने कामे संपण्याचा विषयच नव्हता. 

गेल्या वर्षीची जीएसटी नियम, ऑनलाईन निविदा प्रक्रियेतील अडसर, ग्रामपंचायतींच्या स्थानिक अडचणी यामुळे या कामांचे कार्यारंभ आदेश उशिरा निघाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकारी अलका शिरसाठ या अनेक महिने आजारी रजेवर होत्या. त्यांचा पदभार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे  बदलल्यानेही सरकारी आदेश खालपर्यंत पोहचला की नाही याचीही वेगवेगळी चर्चा आहे. 

मात्र या सगळ्या गोंधळात आता मार्चपुर्वी कामे न झालेल्या कामांचा निधी परत गेला तर त्या कामांचे काय होणार हा मोठा प्रश्न समोर आहे. त्यामुळे ग्रामसेवक व सरंपच हतबल झाले आहेत. 

मढेवडगाव येथील सरपंच महानंदा मांडे म्हणाल्या, काही महिन्यांपुर्वी निवडणूका झालेल्या गावातील सरपंचांना अजून कारभार समजण्यापुर्वीच असा निधी जर परत जाण्याची चर्चा असल्याने अडचणी वाढतील. यावर मध्यममार्ग काढून निधी खर्च करण्यासाठी वाढीव मुदत मिळाली पाहिजे. 

गटविकास अधिकारी अलका शिरसाठ म्हणाल्या, निधी परत जाईल असे अजून निश्चित नाही. त्याबद्दल सप्टेंबर २०१७ मध्ये आलेल्या आदेशाच्या प्रती आम्ही खाली पााठविलेल्या आहेत. आता यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत आहोत.

Web Title: The risk of return to the fund due to no work before March