सांगली शहराची पुन्हा दैना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

सांगली - गेल्या दोन दिवसात शहरात झालेल्या पावसाने पुन्हा एकदा दैना केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच चकचकीत केलेले रस्ते परत खड्ड्यात गेले आहेत. भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या स्वागताला हजेरी लावलेल्या पावसाने शहाराचे वास्तवही समोर आणले आहे. दोन दशकांपासून भिजत पडलेले गुंठेवारीतील  रस्ते, दलदलीचे प्रश्‍न या पावसाने नवीन सत्ताधाऱ्यांसमोर आणले आहेत. त्यामुळे हेच पहिले आव्हान  सत्ताधाऱ्यांना पेलावे लागणार असे दिसते.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरात दोन दिवस पावसाने संततधार धरली. त्याचे परिणाम दिसायचे तसे दिसलेच. शामरावनगरसह गुंठेवारीत परत दलदल निर्माण झाली. पाण्याची तळी साचली. नागरिकांचे हाल सुरू झाले. याकडे नूतन महापौर, उपमहापौरांचे लक्ष जाणार का? त्याचबरोबर सहा महिन्यांपूर्वी  शहरातील बरेच रस्ते झाले. अनेक भागांत गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच असे रस्ते झाल्याचा गाजावाजाही झाला. त्यावेळी हे रस्ते कुणाच्या निधीतून झाले यावर बराच श्रेयवादही रंगला. आता पावसाने चकचकीत रस्त्यांमागचे वास्तव खड्डयांच्या रूपाने समोर आणले आहे.

मात्र त्याची जबाबदारी स्वीकारयला कोण पुढे येणार हा प्रश्‍न आहे. गुंठेवारीसह मारुती रोड, स्टेशन चौक, कोल्हापूर रोड, झुलेलाल चौक, एस.टी. स्टॅंड परिसर, शंभर फुटी रोड आदी भागांसह उपनगरांमध्ये पावसाने दैना केली आहे. पावसाळी मुरुमाचे नियोजन नसल्याने या रस्त्यांकडे  दुर्लक्ष झाले आहे. त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.

पावसाने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अधिकाऱ्यांना त्याची पाहणी करण्याची सूचना दिली आहे. पावसाळी मुरूम टाकण्याबाबत आराखडा तयार केला आहे. आयुक्तांची सही घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अधिकाऱ्यांना याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
- सौ. संगीता खोत, महापौर

Web Title: Road Condition Rain