खड्ड्यांमुळे अंबेनळी घाटाची चाळण!

मेटतळे - अंबेनळी घाटात दुधोशी फाट्यावर दरड कोसळल्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
मेटतळे - अंबेनळी घाटात दुधोशी फाट्यावर दरड कोसळल्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

केळघर - पश्‍चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या महाड-पंढरपूर राज्यमार्गावरील अंबेनळी घाटातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशी दरम्यानच्या १६ किलोमीटर अंतरात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे अक्षरशः जिकिरीचे झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका अवलंबली आहे. 

महाड-पंढरपूर हा राज्यमार्ग असून, महाबळेश्वरहून पोलादपूर-महाड तसेच कोकणात जाणारे प्रवासी तसेच पर्यटक अंबेनळी घाटातूनच प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती देतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, महाबळेश्वर ते वाडा-कुंभरोशी दरम्यान रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. नेमका कोणता खड्डा चुकवावा, असा प्रश्न वाहने चालवताना पडत आहे. मेटतळे, हरोशी व जावळी या गावांच्या हद्दीमध्ये रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. दुधोशी फाट्यावर तर भलीमोठी दरड कोसळली असून, या दरडीचे दगड रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही दिवसांत हीच दरड रस्त्यावर कोसळून दुर्घटना होण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

पार येथील श्रीरामवरदायिनीच्या दर्शनासाठी व प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. नवरात्र उत्सवात तर पार येथे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, अंबेनळी घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे भाविकांसह पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोकणातून महाबळेश्वरला तसेच वाई, साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांची अंबेनळी घाटातून नेहमी वर्दळ असते. मात्र, खड्ड्यांमुळे वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

अंबेनळी घाटात रस्त्याला पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे गाड्यांचे टायर्स पंक्‍चर होण्याचे प्रमाणासह खड्ड्यांत आदळल्याने पाटे तुटण्याचेही प्रमाण वाढले आहे. सामान्य नागरिकांना अंबेनळी घाटातून प्रवास करणे जिकिरीचे झाले असतानादेखील बांधकाम विभाग मात्र गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे हे दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. बांधकाम विभागाने तातडीने हे मोठमोठे खड्डे मुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागातही अडचणींचा सामना
वाडा-कुंभरोशीहून महाबळेश्वर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था ही अत्यंत निकृष्ट असून, वाडा-पार फाटा, घोगलवाडी ते बिरवाडी फाटा, तसेच इतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामीण भागात प्रवास करतानाही अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com