खड्डे, धुळ अन्‌ वाहतूक कोंडी!

Road-Traffic
Road-Traffic

पुसेगाव - कोरेगाव ते पुसेगाव दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत धिम्म्या गतीने सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे, पुलासाठी काढलेले डायर्व्हशन, अरुंद कच्च्या रस्त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व दररोज वाहतुकीमुळे होणाऱ्या धुळीच्या साम्राज्यामुळे गेली सात ते आठ महिने या रस्त्यावरील प्रवाशी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

सातारा- लातूर रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे कोरेगाव ते पुसेगाव दरम्यान संपूर्ण रस्ता उखडण्यात आला आहे. ठेकेदारांच्या मनमानीपणामुळे व कामातील सुसूत्रतेअभावी सध्या काही ठिकाणी पुलांची कामे सुरू असली तरी अनेक ठिकाणी कित्येक महिन्यांपासून पुलाचे केवळ खड्डे खोदून ठेवले आहेत. पुलाजवळील डायर्व्हशन रस्ते अरुंद असल्यामुळे तेथे वारंवार वाहतुकीची कोंडी होते, तसेच पुसेगाव बाजूने वर्धनगड घाट चढताना उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरचालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा या चढावर ट्रॅक्‍टर बंद पडून वाहतूक ठप्प होते. पुलाची कामे लवकर पूर्ण झाली, तर डायर्व्हशन निघू शकतील. 

मोठी वाहने अडकतात 
पाच ते सहा ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून, या रस्त्याच्या उंचवट्यांमुळे लगतचा कच्चा रस्ताही अरुंद झाला आहे. त्यावरून दुहेरी वाहतूक करणे वाहनचालकांना जिकिरीचे झाले आहे. परिणामी या रस्त्यांवर मोठी वाहने अडकून पडत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांना कित्येक तास रखडावे लागत आहे. सध्या चारचाकी वाहनांना कच्च्या रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कामासाठी ठेकेदारांनी आणलेल्या वाहनांच्या सायलेंन्सरची दिशा जमिनीच्या 

बाजूकडे असल्यामुळे ही वाहने मोठ्या प्रमाणात धूळ पसरवत असतात. शिवाय या रस्त्यांवर पाणी मारले जात नसल्यानेही सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने वाहन चालक व प्रवाशी त्रस्त झाले आहेत. अनेकदा धुळीमुळे समोरील वाहने दिसत नसल्याने या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. 

ठरल्यानुसार कार्यवाही नाही
या रस्त्याच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रोजेक्‍ट मॅनेजरनी पुसेगाव परिसरातील कामे यात्रेपूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही सेवागिरी ट्रस्टमध्ये दीड महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत दिली होती; पण त्याप्रमाणे कामाची कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणणार असल्याचे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.

पुलाची कामे जलदपणे पूर्ण करा - जाधव
पुसेगाव यात्रा ३० डिसेंबरपासून सुरू होत आहे. येणाऱ्या लाखो यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रेपूर्वी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. रस्त्यांचे सपाटीकरण करावे. पुलाची कामे जलदपणे पूर्ण करून त्यालगतची डायर्व्हशन काढावीत. धुळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यात्रा काळात कच्च्या रस्त्यावर पाणी मारावे, अशी मागणी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com