खचणारी जमीन अन्‌ अस्वस्थ मने!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

ढेबेवाडी - कसणीजवळच (ता. पाटण) मुख्य रस्त्यासह लगतची जमीनही खचल्याने त्या परिसरातील ग्रामस्थ चिंतेत आहेत. जमीन खचून मुख्य डांबरी रस्ता दोन भागात विभागला गेल्याने तीन दिवसांपासून तेथील एसटीही बंद आहे. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग दुरुस्तीच्या तयारीत व्यस्त असला तरी या घटनेचा अभ्यास करून आवश्‍यक उपाययोजना हाती घेण्याची मागणी होत आहे.

भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून कसणी परिसराची ओळख आहे. अतिवृष्टीच्या या परिसरातील भूस्तर तांबड्या मातीचा हलका असून पावसाळ्यात पाण्याच्या लोटाबरोबर जमीन वाहून जाण्याचे प्रकार घडतात. तेथील रस्ता तीन दिवसांपूर्वी खचून दोन भागांत विभागल्याने कसणी, निगडे, घोटीलसह लगतच्या वाड्या-वस्त्यांचा एकमेकांशी संपर्कच तुटला आहे. रस्त्याला अडीच फूट रुंदीची खोलवर पडलेली भेग आणखीन रुंदावल्याचे आणि त्यालगतचा परिसरही खचल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर धावणारी एकमेव एसटी कसणीपर्यंतच येत असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय सुरू आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, उपअभियंता एस. व्ही. माने यांच्या मार्गदर्शनानुसार कनिष्ठ अभियंता पी. टी. ढेरे यांनी आज घटनास्थळी जावून ठेकेदारांच्या मदतीने रस्ता दुरुस्तीचे नियोजन केले. उद्यापासून (ता. २१) दोन दिवस हे काम चालेल, असा अंदाज आहे. रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरातही जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. हा परिसर भूकंपप्रवण असल्याने या घटनेचा अभ्यास करून आवश्‍यक उपाययोजना हाती घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

चांदोली व मराठवाडी धरणाच्या कुशीतील हा परिसर अगोदरच अनेक अडचणींशी सामना करत असताना आता त्यात नव्या समस्येची भर पडली आहे. संबंधितांनी या प्रकाराचा सखोल अभ्यास करून जनतेला सुरक्षितता द्यावी.
- मीनल मस्कर, सरपंच, कसणी

Web Title: road land rain