... इथून जाते मृत्यूकडे वाट

दत्ता उर्किडे 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

करपडीतील (ता. कर्जत) दगडी पूल पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्याखाली, तर एरवी बंधाऱ्याच्या फुगवट्याच्या पाण्याखाली जात असल्याने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. मोठा पूल होण्यासाठी वारंवार मागणी करूनही कोणी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

राशीन : करपडीतील (ता. कर्जत) दगडी पूल पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्याखाली, तर एरवी बंधाऱ्याच्या फुगवट्याच्या पाण्याखाली जात असल्याने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. मोठा पूल होण्यासाठी वारंवार मागणी करूनही कोणी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

निधी वर्ग होईना 
पुलावर सातत्याने पाणी राहिल्याने पुलास मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. तो वाहतुकीकरिता धोकादायक बनला आहे. ग्रामपंचायतीने या पुलाच्या कामासाठी ग्रामसभेत ठराव करून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, संबंधित अधिकारी पुलाचे अंदाजपत्रक करून जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यासाठी निधी वर्ग झालेला नाही. 

ताफा अडवून मंत्र्यांना दिली होती माहिती 
प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तत्कालीन तहसीलदार किरण सावंत यांना बोलावूनही करपडी ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घातले. तसेच, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनाही बाभूळगाव दुमाला येथील विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी जात असताना त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून करपडी ग्रामस्थांनी पुलाबाबत व्यथा मांडली होती. मात्र, अद्याप या पुलाचे काम न झाल्याने पाण्यातून मार्ग काढण्याशिवाय ग्रामस्थांपुढे पर्याय नव्हता. विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरून पाण्यातून वाट काढावी लागत आहे. 

चार वस्त्यांचा प्रश्‍न 
करपडीअंतर्गत हाके वस्ती, सोलनकर वस्ती, राऊत वस्ती, काळे वस्ती, ढवळे वस्तीसह दक्षिण व पश्‍चिम बाजूकडील चार किलोमीटरच्या परिसरातील, पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी व ग्रामस्थांना या पुलावरील पाण्यातून रोज ये-जा करावी लागत आहे. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मागणी करूनही लक्षात घालत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 

प्रस्ताव पाठवून तीन वर्षे झाली : काळे 
करपडीचे माजी सरपंच सुनील काळे म्हणाले, ""पुलाच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवून तीन वर्षे उलटली. अधिकारी प्रस्ताव पाठविल्याचे सांगतात. मात्र, हा प्रस्तावच जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागात मिळत नाही, ही शोकांतिका आहे.'' 

अन्यथा आंदोलन करू : देशमुख 
ग्रामस्थ यशवंत देशमुख म्हणाले, ""करपडी परिसरातील दूध उत्पादक डेअरीला दूध घालण्यासाठी आणि भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, पुलावर पाणी असल्याने अनेकादा अडचणी निर्माण होत आहेत. या पुलासाठी आता तीव्र आंदोलन करण्यात येईल.'' 

प्रस्तावाला मंजुरी मिळेना! : काळदाते 
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रामदास काळदाते म्हणाले, ""संबंधित पुलाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दोनदा पाठविला आहे. मात्र, त्यास मंजुरी मिळालेली नाही.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: .... the road leading to death