सोलापुरातील  कचरा संकलनासाठी 'रोड मॅप'

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

घंटागाड्यांसाठी मार्ग निश्‍चित करून देण्यात आला होता. मात्र, त्यांच्या कामाची अचूक नोंदणी होत नव्हती. आता मॅप तयार करण्यात आल्याने कोणती गाडी कोणत्या मार्गावर गेली याचीही नोंदणी होणार आहे. प्रत्येक गाडीला परिसर निश्‍चित करून देण्यात आला आहे. त्या परिसरातच संबंधित गाडीने जाणे आवश्‍यक आहे. एबीडी एरियासाठी 23 तर उर्वरित शहारासाठी 125 मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. 

सोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत "एबीडी' परिसरातील कचरा संकलन करण्यासाठी 'रोड मॅप' तयार करण्यात आला आहे. त्याचवेळी, उर्वरित शहरासाठीही स्वतंत्रपणे 'मॅप' तयार करण्यात आला आहे. 225 घंटागाड्यांतून रोज 148 मार्गांवर कचरा संकलित केला जात आहे. 

यापूर्वी, घंटागाड्यांसाठी मार्ग निश्‍चित करून देण्यात आला होता. मात्र, त्यांच्या कामाची अचूक नोंदणी होत नव्हती. आता मॅप तयार करण्यात आल्याने कोणती गाडी कोणत्या मार्गावर गेली याचीही नोंदणी होणार आहे. प्रत्येक गाडीला परिसर निश्‍चित करून देण्यात आला आहे. त्या परिसरातच संबंधित गाडीने जाणे आवश्‍यक आहे. एबीडी एरियासाठी 23 तर उर्वरित शहारासाठी 125 मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. 

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरातील 790 ठिकाणचे कचरा कोंडाळे हटविण्यात आले आहेत. दैनंदिन 400 मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. 225 घंटागाड्यांच्या मदतीने शहरातील कचऱ्याचे संकलन घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले महापालिकेचे कंटेनर, कचरा कोंडाळे काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. यानुसार याची कार्यवाही सफाई विभागाकडून करण्यात येत आहे. शहरात 400 मोठे कंटेनर ठेवण्यात आले होते. यातील 175 कंटेनर हटविण्यात आले आहे. छोट्या 110 कचरा कोंडाळ्यांपैकी 60 कोंडाळे उचलण्यात आले आहेत.

शिवाय, शहरातील विविध ठिकाणी छोटे-मोठे ओपन व हौद टाईपचे कचरा कोंडाळेही हळूहळू काढण्यात येत असून, त्यापैकी 250 हून अधिक कचरा कोंडाळे हटविण्यात आले आहेत. शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी हायटेक पद्धतीने कचरा उचलण्यात येत असून येत्या महिनाभरात शहरातील संपूर्ण कचरा कोंडाळे काढण्यात येऊन घरोघरी जाऊन तसेच शॉपिंग मॉल, दवाखाने व अन्य ठिकाणी जाऊन कचरा संकलन करण्यात येणार आहे. 

संयुक्त उपक्रम राबविला जाणार 
घनकचऱ्यासंदर्भात मिटकॉन, स्मार्ट सिटी कंपनी आणि घनकचरा विभाग यांच्या संयुक्तपणे उपक्रम राबविले जाणार आहेत. सध्या या तिन्ही विभागांत ताळमेळ नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या सर्व विभागांची बैठक घेऊन, यापुढील सर्व उपक्रम संयुक्तरीत्या राबविण्याचे आदेश दिल्याचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.

Web Title: road map For the collection of garbage in solapur