राहुरीमध्ये टवाळखोरांची धुलाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

टवाळखोर तरुणांची त्यांनी धुलाई केली. काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आज दुपारनंतर शहरात शुकशुकाट पसरला.

राहुरी : राज्यात जमावबंदीचा आदेश असताना, रस्त्याने फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलिसी खाक्‍या दाखविण्यास सुरवात झाली. काहींना रस्त्यावरच उठाबशांची शिक्षा, तर काहींना चोप दिला. काहींना पोलिस ठाण्यात आणून बसविले. त्यानंतर टवाळखोर सरळ झाले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत; परंतु काहींना अजूनही त्याचे गांभीर्य दिसत नाही. शहरात आज काही टवाळखोर विनाकारण रस्त्याने फिरत होते. अखेर तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी कडक धोरण स्वीकारले. पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके व राहुल सानप यांनी फौजफाट्यासह तालुक्‍यात व शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली.

रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू केली. शनी चौकात पोलिस अधिकाऱ्यांशी उद्धटपणे वागणाऱ्या तरुणाची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. शहरातील शनिचौक, शिवाजी चौक, शुक्‍लेश्वर चौक, पृथ्वी कॉर्नर, नवी पेठ, जुनी पेठ येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टवाळखोर तरुणांची त्यांनी धुलाई केली. काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आज दुपारनंतर शहरात शुकशुकाट पसरला. राहुरी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात निर्जंतुकीकरणाच्या औषधफवारणीचे काम दिवसभर सुरू होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Romios punished by police in Rahuri