रस्ता सुरक्षेचे धडे शालेय शिक्षणात मिळणे आवश्‍यक - शेखर गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सांगली - भारतात अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घरातील कमावता मनुष्य अपघातात गेल्याने जवळपास २८ टक्के कुटुंब दारिद्य्ररेषेखाली आली आहेत. सर्वांनी आपल्याबरोबर इतरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. रस्ता सुरक्षेचे धडे शालेय शिक्षणातच मिळणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे केले.

सांगली - भारतात अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घरातील कमावता मनुष्य अपघातात गेल्याने जवळपास २८ टक्के कुटुंब दारिद्य्ररेषेखाली आली आहेत. सर्वांनी आपल्याबरोबर इतरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. रस्ता सुरक्षेचे धडे शालेय शिक्षणातच मिळणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे केले.

येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात २८ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, ‘आरएसपी’ चे महासमादेशक अरविंद देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘रस्ता सुरक्षेचे धडे देण्यासाठी आष्टा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले आहे. जवळपास सहा हजार विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. रस्ता सुरक्षेचे प्रात्यक्षिक धडे शालेय शिक्षणात आवश्‍यक आहेत. त्यामुळे बालवयातच वाहतुकीची शिस्त अंगी बाणेल. रस्ते अपघातांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ५०० मीटर परिसरात मद्य विक्रीला बंदी घातली.’’

आमदार गाडगीळ म्हणाले, ‘‘चांगल्या रस्त्यांसाठी ३३ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी आरएसपी विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. महापालिका क्षेत्रात प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षेचा एक तास असावा. वर्षाअखेरीला परीक्षा घ्यावी. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाईल.’’ पोलिस अधीक्षक शिंदे म्हणाले, ‘‘उत्कृष्ट दर्जाची रस्ता बांधणी, रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती आणि वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई यामधून रस्ता सुरक्षा निर्माण होईल.’’

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भोसले, आयुक्त खेबुडकर, आरटीओ वाघुले, महासमादेशक देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर वाहनांची तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तरुण भारत स्टेडियमवर सांगता झाली. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी आभार मानले.

Web Title: road security learn in school education