ऑफरोड रॅलीचा थ्रील न्याराच!

ऑफरोड रॅलीचा थ्रील न्याराच!

पाचगणी - निसर्गाच्या जादुई किमयांचा मनसोक्त आनंद घेण्याकरिता पाचगणी रोटरी क्‍लबने आयोजित केलेल्या ॲडव्हेंचर ऑफरोड रॅलीला उत्साह, थ्रीलबरोबरच सामाजिक जाणीवता व प्रबोधनाची अजोड किनार देऊन ऑफरोड रॅली मिशन पूर्ण केले.

निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा म्हणून ‘रोटरी’चे माजी अध्यक्ष सुरेश बिरामणे, नितीन भिलारे, अध्यक्ष राजेंद्र भगत, मुराद खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पहिल्या ऑफरोड रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १४० किलोमीटर अंतराची व चालकांचे कसब पणाला लावू पाहणाऱ्या या रॅलीकरिता प्रथमतः रेकी करण्यात आली. वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील ५० जणांचा लवाजमा आपल्या एसयूव्ही, जिप्सी व जीप गाड्या घेऊन शिवाजी चौकात तैनात झाले. शाहरोम जवामर्दी, विवेक बोधे यांनी हिरवा कंदील दाखवला अन्‌ वाहने महाबळेश्वरच्या दिशेने सुटली... ही शर्यत नसली तरी ॲडव्हेंचर रॅली असल्याने उत्साहही तितकाच दांडगा होता... महाबळेश्वरमार्गे तळदेव, पुरडाणी, कोटीशी पूल, अहिरे, गाडवली, दरे, पिंपरी अशा मार्गाने वाट काढत असताना काही ठिकाणी सपाटीचा, तर कधी खडतर असा तर पुढे चिखलाचे साम्राज्य, ओढ्या नाल्यातून मार्ग काढत रॅली मार्गस्थ होत होती.

पिंपरी हे विसाव्याचे ठिकाण ठरले. भोजनाकरिता लागणारे साहित्य तेथील स्थानिकांच्या स्वाधीन केले व त्यांनी चुलीवर बनविलेले पिटले, भाकरी, भरलेले वांगे, मिरचीचा खर्डा, चिकन अशा मेजवानीचा आस्वाद घेतल्यानंतर गाड्यांचा ताफा परतीच्या मार्गावर लागला. गाड्या फेरी बोटमध्ये टाकून तळदेव येथे सर्व जण दाखल झाले. रॅलीच्या थ्रीलबरोबरच स्थानिकांना भोजन बनविण्याची संधी देऊन त्यारूपाने तात्पुरती उद्योगाची दिलेली संधी, संपूर्ण रॅलीत कोठेही हॉर्नच्या आवाजाचे प्रदूषण होऊ नये याची दक्षता, रानावनात स्वच्छता अबाधित राहावी म्हणून सर्व कचरा गाडीत टाकून परत आणला. त्याचबरोबर नागरी समस्या व त्या भागातील व्यथा जाणून घेतल्याने निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत रॅलीच्या उत्साह अन्‌ नवचैतन्याबरोबर सामाजिक जाणीवता व प्रबोधन केल्याचे समाधान मिळून एक आनंद द्विगुणित झाल्याचे नितीन भिलारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com