निष्काळजीपणा! डांबरीकरण..डांबराचा लवलेशही नाही

road work kurlap sangli district
road work kurlap sangli district

कुरळप (सांगली) - डांबरीकरण करताना डांबराचा लवलेश न ठेवता येथे केवळ खडी टाकून तकलादू काम ठेकेदाराकडून राजरोस सुरू आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून निकृष्ट काम उत्कृष्टपणे करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. परिसरातील नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची काल पोलखोल केली. यात रस्ता उकरुन पाहिला तरी डांबर दिसले नाही. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनीही तकलादू कारण देत वेळ मारुन नेली. डांबराच्या अत्यल्प वापराव्यतिरिक्त रस्त्याच्या कामात वापरली जाणारी खडीही मातीमिश्रीत आहे. यामुळे डांबर नसलेला रस्ता किती दिवस तग धरणार? याविषयी नागरिकांत चर्चा आहे. 

कुरळप (ता. वाळवा) येथे कुरळप फाटा येथून नूतन रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपासून सुरू आहे. या कामाच्या माहितीचा कोणत्याही प्रकारचा फलक ठेकेदाराने लावलेला नाही. ठेकेदार कोण आहे हे फक्त सत्ताधारी गटाच्या काही प्रमुख नेत्यांनाच माहीत. इतर लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. लोकांच्या तक्रारींची दखल घेण्याऐवजी त्यांनी निकृष्ट कामाची पोलखोल करणाऱ्या नागरिकांनाच दोन शब्द सुनावले. यामुळे कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

कुरळप फाटा ते कुरळप हा रस्ता खूप रहदारीचा आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या रस्त्याचे काम चांगले होणे आवश्‍यक आहे. रस्त्याचे डांबरीकरण व दुतर्फा बाजूला साईडपट्टी व नाले उकरुन पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशीही मागणी येथील नागरिकांची आहे. पावसाळा जवळ येत असून ठेकेदाराने झटपट कामाचा सपाटा लावला आहे. लवकर काम उरकण्याच्या प्रयत्नात निकृष्ट काम होत असून संबंधित बांधकाम विभागाने तत्काळ कारवाई करून काम उत्कृष्ट करण्याचे व कामाच्या माहितीचा फलक लावण्याचा आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

डांबरीकरण खूपच सुमार दर्जाचे आहे. कामाच्या माहितीचा कुठेही फलक नाही. यामुळे कामाबाबत काही माहिती मिळत नाही. ठेकेदार डांबर न वापरता रस्ताचे काम वेगाने करत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत अनेकदा माहितीची विचारणा केली; मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. 
- सुनील कांबळे, युवक क्रांती ग्रुप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com