नगरमध्ये आक्रीत घडलं... चोरांनीच चोरांना गंडवलं 

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

धुरपते यांच्याकडे अनेकदा मोठमोठ्या रकमा असतात, हे चालकास माहीत होते. कारण हा चालक सुमारे चार वर्षांपासून धुरपते यांच्याकडे कामास होता. धुरपते त्याला नातेवाइकाप्रमाणे वागवत होते. मोठी रक्कम आल्यानंतर डाव साधायचा असा विचार होता

पारनेर (नगर) ः नगर जिल्ह्यात आक्रीत घडलंय. चोरांनीच चोरांना गंडवलं. थोडंथिडकं नव्हे तब्बल 30 लाखांचा हा गंडा आहे. तालुक्‍यातील जामगावचे रहिवासी व मुंबईस्थित उद्योजक सूर्यभान ऊर्फ सुरेश धुरपते यांच्या आलिशान कारमधून बुधवारी रात्री 55 लाख रुपयांची रक्कम चोरीस गेली होती. धुरपते यांनी पैशांची बॅग घरात न ठेवता गाडीतच का ठेवली, असा पोलिसांपुढे प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र, या चोरीच्या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. त्यांच्या गाडीचा चालकच चोरीतील सूत्रसंचालक निघाला आहे. 

धुरपते यांच्याकडे अनेकदा मोठमोठ्या रकमा असतात, हे चालकास माहीत होते. कारण हा चालक सुमारे चार वर्षांपासून धुरपते यांच्याकडे कामास होता. धुरपते त्याला नातेवाइकाप्रमाणे वागवत होते. मोठी रक्कम आल्यानंतर डाव साधायचा असा विचार होता. 

असा दिला अंजाम 
या गुन्ह्यातील आरोपी हे अट्टल गुन्हेगार आहेत. आरोपींनी पैसे चोरीच्या वेळी दोन चारचाकी गाड्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यांनी बॅग पळवल्यानंतर एका चारचाकी गाडीत टाकली. पैसे दुसऱ्या दिवशी सकाळी वाटप करायचे, असे त्यांचे ठरले होते. पोलिसांना संशय येऊ नये, म्हणून चोरटे वेगवेगळ्या गाडीत बसले. 
पहिल्या गाडीतील चोरट्यांनी बॅग बदलून दुसऱ्या गाडीत टाकली. त्यानंतर त्या वेगवेगळ्या दिशेने व वेगवेगळ्या ठिकाणी गेले. 

दुसऱ्या दिवशी ही सगळी मंडळी एका जागी पैसे वाटून घेण्यासाठी ठरल्याप्रमाणे एकत्र जमा झाली. त्या वेळी पैशाची बॅग बदलल्याचे दुसऱ्या गाडीतील लोकांच्या लक्षात आले. त्यांनी बॅग बदलण्याचे कारण विचारले. 
पोलिसांना संशय येईल किंवा ती बॅग ओळखली जाईल, म्हणून आम्ही तसे केल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. पैशांचे वाटप करताना त्यात अवघे 25 लाख रुपयेच निघाले. इतके कमी पैसे कसे निघाले? हे दुसऱ्या गटाने विचारले. बॅगमध्ये एवढेच पैसे होते, असे त्यांनी उत्तर दिले. त्या वेळी भांडण न करता सबुरीने 
पैशांचे वाटप करून घेतले. 

फिर्यादीनंतर कळली खरी रक्कम 
दरम्यान, धुरपते यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यात त्यांनी बॅगेत 55 लाख रुपये असल्याचे नमूद केले. त्या वेळी इतर चोरांना आपण गंडवलो गेल्याचे लक्षात आले. साथीदारांनी तब्बल 30 लाख रुपयांचा गफला केल्याने त्यांचा तिळपापड झाला. आपल्याच मित्रांना फसवून ते चोरावर मोर झाले आहेत. 
पोलिसांनी बॅग पळवण्यासाठी वापरलेली गाडी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे जे फसवले गेले होते, तेच चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यांच्याकडील रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे. गफला करून पळालेल्यांनी पोलिसांनाही गुंगारा दिला आहे. त्यात किमान आठ आरोपी असल्याचे सांगितले जाते. 

पाठशिवणीचा खेळ 
पळून गेलेले आरोपी पोलिसांना गुंगारा देत आहेत. ते काही काळानंतर मोबाईल चालू करतात. पोलिस त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवतात. मात्र, काही काळानंतर ते दुसऱ्याच ठिकाणी असतात. पसार झालेले चोरटे सराईत गुन्हेगार आहेत. या चोरीच्या प्रकरणातील सूत्रधार व धुरपते यांच्या गाडीचा चालक धनंजय ऊर्फ धोंडिभाऊ शिवाजी नरसाळे व दाऊद समशोद्दीन शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The robbers rob the thieves