नकली पिस्तुलाचा धाक दाखवून भडगावात दरोडा

नकली पिस्तुलाचा धाक दाखवून भडगावात दरोडा

गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी तीनच्या सुमारास बाळासाहेब कोडोली यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चौघा दरोडेखोरांनी नकली पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. भरदिवसा घडलेल्या या थराराने भडगावसह तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, संबंधित दरोडेखोरांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी पाठलाग केला. परंतु, ते मोटरसायकलीने पसार झाले. घटनेत साडेसात हजारांचा किरकोळ ऐवज लंपास झाला असला, तरी दिवसाढवळ्या झालेला हा प्रकार पोलिसांनाच आव्हान देणारा ठरला.

भडगावातील मुख्य रस्त्यावर कल्लेश्‍वर सोसायटीसमोर कोडोली यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दुकानात पत्नी प्रेमलता व भाची सुप्रिया होती. आतील खोलीत बाळासाहेब होते. दोघी महिलाच असल्याची संधी साधून दुपारी तीनच्या सुमारास चौघेजण दुकानात शिरले. त्यानंतर लगेचच पिस्तूल काढून धाक दाखवला. काउंटरवरून उडी मारून दागिन्यांचे सर्व बॉक्‍स ताब्यात घेत होते. तोपर्यंत आतील खोलीतून बाळासाहेब बाहेर आले. त्यांनी ओरड सुरू केली. इतक्‍यात दरोडेखोरांनी दुकानातीलच स्टूलने बाळासाहेब व सुप्रियाला मारहाण केली.

बाळासाहेबांचा आवाज ऐकून शेजारील लोक धावून आले. दरोडेखोरांकडे असलेल्या पिस्तुलामुळे जवळ जाण्याचे धाडस कोणी करेना. लोकांच्या गर्दीतून पकडले जाण्याच्या भीतीने दरोडेखोरांनी लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवला. दागिन्यांचे बॉक्‍स तेथेच टाकले. नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलीने चौघेही पसार झाले. घटनेत साडेसात हजाराची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी मात्र दरोडेखोरांनी लंपास केल्याची फिर्याद श्री. कोडोली यांनी दिली आहे. यानंतर नागरिकांनी दुकानासमोर गर्दी केली. काही वेळांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपअधीक्षक अनिल कदम, निरीक्षक विपिन हसबनीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रोकडे करीत आहेत.

राजमाने, पट्टणकुडींचे धाडस... 
कोडोली यांनी ओरड केल्यानंतर शेजारच्या कापड दुकानातील अमित राजमाने धावत गेले. लगेचच शिवाजी पट्टणकुडीही तेथे पोचले. दरोडेखोरांच्या हातात पिस्तूल दिसत असूनही या दोघांनी धाडसाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. सोन्याच्या दुकानासमोर असलेली झाडाची कुंडी हातात घेत अमितने दरोडेखोराच्या पायावर आदळली. त्यातूनही पिस्तुलाचा धाक दाखवत चोरटे ग्रामपंचायतीसमोरून नदीवेसच्या दिशेने मोटरसायकलीवर बसून पसार झाले. पाठलाग केला; परंतु ते सापडले नाहीत. या दोघांनी धाडसाने त्यांना अडवण्यासाठी पुढाकार घेतला म्हणूनच पकडले जाण्याच्या भीतीने दरोडेखोर किमती दागिन्यांचे बॉक्‍स तेथेच टाकून पसार झाले. अमित व शिवाजीच्या या धाडसाचे गावात कौतुक होत आहे. 

दरोड्यापूर्वी रेकी
मुख्य रस्त्यावरील लोकांच्या सांगण्यानुसार, दरोडेखोर सहाजण होते. यांतील चौघे दुकानात तर दोघेजण पाळतीसाठी लांब थांबले होते. चोरीच्या काही वेळापूर्वी यातील काहीजण मोटरसायकलीने या दुकानासमोरून फेरी मारून माहिती घेऊन गेल्याची चर्चा गावात आहे. त्यातच आज कल्लेश्‍वर सोसायटी बंद होती. दुपारची वेळ असल्यानेही या परिसरात वर्दळ कमी होती. दुकानात दोन महिलाच असल्याची संधी साधून दरोडेखोरांनी हा प्रकार केला. यामुळे रेकी करूनच हा दरोडा टाकल्याचे गावकरी सांगताहेत.

सीसीटीव्हीत कैद
कोडोली यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दुकानात चौघांनी प्रवेश केल्याचे यात दिसत असून यातील दोघांनीच तोंडाला कापड बांधले होते. दोघांच्या चेहऱ्यावर काहीच नव्हते. दरोडेखोर हे २० ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. हे सर्वजण परिसरातीलच असावेत असा संशय पोलिसांचा आहे. यामुळे दरोड्याचा छडा लवकरच लावू असा विश्‍वास पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी व्यक्त केला.

पिस्तूल असली की नकली ?
गडहिंग्लज तालुक्‍यात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची चर्चा आहे. दरोडेखोरांकडील रिव्हॉल्व्हर हे नकली असल्याचा दावा सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीनंतर पोलिसांनी केला आहे. फिर्यादीतही तशीच नोंद आहे; मात्र गावात दिवसभर रिव्हॉल्व्हर असली की नकली, याबाबत संभ्रम कायम होता.

पंधरवड्यातील दुसरी घटना
बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे ७ सप्टेंबरच्या रात्री निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून १६ लाखांची चोरी झाली होती. या घटनेच्या तपासात पोलिसांना अजून यश आले नसतानाच पंधरवड्यातच आज भडगाव येथे भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने तालुक्‍यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांतून साशंकता व्यक्त होत आहे. अधूनमधूनही भुरट्या चोरीच्या घटनांनी लोकांना त्रस्त करून सोडले आहे. लोक भीतीच्या छायेत आहेत. शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवरच्या भडगावातील या घटनेसह बसर्गे येथील चोरीच्या तपासाचे आव्हानही पोलिसांसमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com