
सांगलीत चोरींचे सत्र जोरात
• धूम स्टाईलने मंगळसुत्र चोरी
• रामरहिम नगरमध्ये घरफोडी
सांगली - बुधगाव येथील रेणुका मंदिरात कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी दहाच्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मंदिराचे पुजारी मधुकर सीताराम आवळे (वय 55) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी अमोल शिरतोडे (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बुधगाव (ता. मिरज) येथील शिवाजीनगर परिसरातील गल्ली नंबर तीनमध्ये रेणुका देवीचे मंदिर आहे. पुजारी मधुकर आवळे मंदिरातच एका खोलीत राहतात. आवळे हे गुरूवारी (ता. 21) साडेनऊच्या सुमारास कामानिमित्त परगावी गेले होते. गावाला जाताना त्यांनी मंदिराच्या बाहेरील दरवाज्याला कुलूप लावले होते.
चोरट्याने पाळत ठेवून मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्याने देवीच्या मूर्तीवरील 17 ग्रॅम वजनाची तीन मंगळसुत्र, बोरमाळ, गोल मण्यांचा बारा ग्रॅम वजनाचा हार, बांगड्या आणि रोख रक्कम 8 हजार असा दोन लाख 44 हजार रूपयांचे मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, आवळे हे शनिवारी (ता.23) सकाळी दहा वाजता परतले. त्यावेळी त्यांना मंदिरातील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यावेळी आवळे यांच्या घरातही चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर संशयित अमोल शिरतोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - आम्ही कोल्हापुरी ! मटण दरवाढीवर आमचा असाही तोडगा
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसडा मारून लंपास केले. 15 हजार रूपयांचे 7 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वाट्या आणि 6 मणी चोरट्यांच्या हाती लागल्या. याप्रकरणी दोघा अज्ञात दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उज्ज्वला मनोहर कमरे (वय 52) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कमरे या कोल्हापूर रस्त्यावरील खिलारे मंगल कार्यालयाजवळ राहतात. शुक्रवारी (ता.22) साडेसहाच्या सुमारास त्या आणि त्यांचे पती दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी शहरातील पिंक पॅलेसजवळ आल्या. साडेसहाच्या सुमारास भरधाव दुचाकीवरून दोघेजण आले. दोघांनीही मंगळसुत्रास हिसडा मारला. त्यातील 15 हजार रूपयांचे दोन सोन्याच्या वाट्या आणि चार मणी चोरट्यांच्या हाती लागले. चोरीच्या घटनेनंतर आरडाओरडा केला. परंतु चोरटे भरधाव वेगात पसार झाले. विशेष म्हणजे कमरे हे दुचाकीवरून जात असताना ही धाडसी चोरी करण्यात आली. शहर पोलिसात या संदर्भात फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. दोघेही पंचवीस ते तीस वयोगटातील असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
हेही वाचा - पंचगंगा घाटावरचा बावीसशे वर्षांपूर्वीचा इतिहास
कुपवाड रस्ता परिसरातील रामरहिमनगरमधील बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरी करण्यात आली. चोरट्यांनी 32 हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भारती रवींद्र पवार यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की भारती पवार यांचे रामरहिमनगरमधील वृद्धाश्रमाजवळ त्यांचे घर आहे. कामानिमित्त मंगळवारी (ता. 19) साडेपाच्या सुमारास त्या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने पाळत ठेवून घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले मंगसुत्र, कर्णफुले, अंगठी, चांदीचा करदोडा असा 32 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. पवार या पुन्हा घरी परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानुसार अज्ञाताविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात एक ठिकाणी घरफोडी, तर दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला. त्यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. पोलिसांनी गस्तीपथके वाढवावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरातील मटणाच्या दराचा वाद उच्च न्यायालयात