उत्तूरमधील चोरीला गेलेल्या पाच लाखांचा छडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

उत्तूर - येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याची पाच लाख २२ हजार ५०० रुपये असलेली बॅग लंपास झाली होती.  आजरा पोलिसांनी तातडीने तपास करून चार तासांत चोरीचा छडा लावला. या प्रकरणी हॉटेलमालकासह अभियंत्याला अटक झाली आहे.

उत्तूर - येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याची पाच लाख २२ हजार ५०० रुपये असलेली बॅग लंपास झाली होती.  आजरा पोलिसांनी तातडीने तपास करून चार तासांत चोरीचा छडा लावला.  या प्रकरणी हॉटेलमालकासह अभियंत्याला अटक झाली आहे. रविवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकावर ही घटना घडली होती. याबाबत राजेंद्र शिवाजी मगदूम (वय ३१, बुद्धिहाळ, ता. चिक्‍कोडी, बेळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी; मगदूम फुलाचे व्यापारी आहेत. गोवा येथून फुलाच्या विक्रीचे पैसे वसूल करून ते आंबोली-आजरा-उत्तूरमार्गे चिक्‍कोडीकडे मोटारीतून जात होते. उत्तूरमध्ये आल्यावर ते ऑलविन चायनीज सेंटर या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबले. या वेळी त्यांचा भाऊ मधुकर बाळू मगदूमही सोबत होता. मगदूम यांनी पैशांची बॅग जवळील खुर्चीवर ठेवली होती. नाष्टा करून झाल्यावर दोघे काँटरवर पैसे देण्यासाठी गेले. पैसे देऊन पुन्हा परत आल्यावर त्यांना बॅंग चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत हॉटेलचालक व आजूबाजूला चौकशी केली असता बॅग सापडली नाही. बॅग गेल्याने एकच खळबळ उडाली.   

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सत्यजित घुले, सहायक फौजदार पांडुरंग दोरुगडे, पोलिस नाईक सतीश वर्णे यांनी तपासाला सुरवात केली. या वेळी हॉटेलमालक विकी फ्रान्सिस कुडतात यांनी ही बॅग प्रसाद बाळकृष्ण गुरव यांच्याकडे दिल्याचे पुढे आले. प्रसादने ती बॅग जखेवाडी रस्त्याकडेला शेतात लपवून ठेवली होती. पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने बॅग पोलिसांच्या हवाली केली.

कुटुंबाला धक्का
दरम्यान, यातील आरोपी प्रसाद अभियंता आहे. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत झाले आहेत. सुशिक्षित घराण्यातील या युवकाचे प्रताप पाहून गुरव कुटुंबाला डोक्‍याला हात लावायची वेळ आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery incidence in Uttur Kolhapur follow up