जतमध्ये ज्वेलर्स दुकान फोडून सुमारे २५ लाखाच्या एेवजाची चोरी

विजय पाटील
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सांगली - जत शहरातील मंगळवार पेठेतील श्रीविजय ज्वेलर्स हे दुकान रविवारी रात्री चोरट्यांनी फोडले. ४६५ ग्रँम सोने व २७ किलो चांदी असा सुमारे २५ लाख रुपयांच्या एेवज चोरट्यांनी लंपास केला.  सोमवारी सकाळी सहा वाजता ही चोरी उघडकीस आली.

सांगली - जत शहरातील मंगळवार पेठेतील श्रीविजय ज्वेलर्स हे दुकान रविवारी रात्री चोरट्यांनी फोडले. ४६५ ग्रँम सोने व २७ किलो चांदी असा सुमारे २५ लाख रुपयांच्या एेवज चोरट्यांनी लंपास केला.  सोमवारी सकाळी सहा वाजता ही चोरी उघडकीस आली. जत शहरातील मुख्य बाजारपेठेत झालेल्या या चोरीने सराफी व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत येथील मंगळवार पेठ, जत नगरपरिषदेच्या शेजारी सुनील महादेव कदम यांच्या मालकीचे श्रीविजय ज्वेलर्स हे ज्वेलरीचे दुकान आहे. दुकानाला बाहेरून लाकडी दरवाजा तर आतून सरकता लोखंडी स्लायडींग दरवाजा आहे. या दुकानाला लाकडी व लोखंडी दरवाजाला कूलूप लावले होते. नागपंचमीसाठी त्यांनी सोने-चांदीच्या मालाची खरेदी केली होती. नेहमीप्रमाणे कदम रविवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून रामरावनगर येथील राहत्या घरी गेले.

दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानातील प्रथम लाकडी व लोखंडी दरवाजाच्या कड्या तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील लोखंडी तिजोरी तोडून त्यातील ठेवलेले सोने ४६५ तोळे व चांदी २७ किलो असा एकूण २४ लाख ४८ हजारांचा माल चोरट्यानी लंपास केला. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. सकाळी सहा वाजता  दुकानाचे मालक कदम यांना फोनवरून नागरिकांनी  माहिती दिली. त्यानंतर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. दरम्यान  सांगली पोलीस दलातील बिल्लू श्वानास पाचारण करण्यात आले. यावेळी या श्वानाने दुकानापासुन लोखंडी पूलाच्या बाजूच्या रस्त्यापर्यंतचा माग काढला व अज्ञात चार चाकीच्या वाहनाच्या चाकाच्या ठशाजवळ श्वान घुटमळले. दरम्यान या घटनेची फिर्याद सुनील कदम यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery in Jat Jewelers Shop