कोल्हापूरः कळे येथील यशवंत सहकारी बँकेत चोरी

कोल्हापूरः कळे येथील यशवंत सहकारी बँकेत चोरी

कळे - येथील यशवंत सहकारी बॅंक लुटून चोरट्यांनी ६५ लाख ७८ हजार ३६५ रुपये किमतीचे सोने व आठ लाख ५६ हजार ५५५ ची रोकड असा एकूण ७४ लाख ३५ हजार ९२० रुपयांचा ऐवज लुटला.

कळे-बाजारभोगाव मार्गावरील कळे बाजारपेठेत काल (ता. ७) रात्री बारा ते दीडच्या सुमारास ही लूट केली. तिजोरी फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला. याबाबत शाखाधिकारी शिवाजी भिके यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्यात वापरलेले गॅस कटरचे सिलिंडर बॅंकेच्या मागील बाजूस विहिरीत सापडले.

घटनास्थळ तसेच पोलिसांनी दिलेली माहिती अशी - कळे येथील श्रीराम दूध संस्थेच्या मालकीच्या इमारतीत यशवंत सहकारी बॅंकेची शाखा आहे. या इमारतीच्या मागील बाजूची लोखंडी खिडकी गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरट्यांनी बॅंकेत प्रवेश केला. त्यानंतर लॉकरभोवती असलेली लोखंडी संरक्षक जाळी व मुख्य लॉकरचा वरचा भागही गॅस कटरने कापला. त्यानंतर लॉकरमध्ये रोख रक्कम व तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या असलेल्या एकूण ३०४ कलमांपैकी पहिल्या कप्प्यातील हाताला लागलेली १४७ कलमे व रोकड चोरट्यांनी पळविली. काही रोकड गॅस कटरमुळे जळाली.

तळाच्या कप्प्यातील दागिन्यांची १५७ कलमे चोरट्यांच्या हाती लागली नाहीत. सकाळी सव्वानऊला शिपाई सावळा कांबळे नेहमीप्रमाणे बॅंकेचे शटर उघडून आत गेले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अध्यक्ष एकनाथ चित्राप्पा पाटील व शाखाधिकारी शिवाजी भिके यांना चोरीची माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक अनिल कदम, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई, सायबर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे व शाहूवाडी विभागातील सर्व प्रभारी अधिकारी, बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश देसाई, सदस्य सुभाष पाटील आदींनी भेट देऊन पाहणी केली.

दुपारी ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. गॅस कटरच्या उग्र वासामुळे श्‍वानपथक माग काढू शकले नाही. चोरट्यांनी बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नासधूस केली. बॅंकेत प्रवेश केलेले चार चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यांनी तोंडाला मास्क घातल्याचे त्यात दिसते. चोरटे पंचवीस ते तीस वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी संगणकाचीही नासधूस केली.

दरम्यान, रात्री उशिरा बॅंकेच्या मागील बाजूस शेतात असलेल्या कमळ बाव नावाच्या विहिरीत बुडबुडे येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पाणबुड्यांच्या मदतीने पाहणी केली असता सिलिंडर असल्याचे स्पष्ट झाले, ते बाहेर काढण्यात आले.

दरोड्यामागे माहितगार
चार महिन्यांपूर्वी बाजारभोगाव शाखेतही याच पद्धतीने लूट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. आज कळे येथे लुटलेली बॅंक व बाजारभोगावातील बॅंक लुटीच्या पद्धतीत सारखेपणा दिसत आहे. त्यामुळे या लुटीमागे माहितगारच असल्याचा संशय व्यक्त होत आहे, त्या अनुषंगाने तपास होण्याची आवश्‍यकता आहे.

छायाचित्र घेण्यास मनाई
दरोड्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची छायाचित्रे घेण्यास मनाई केली.

बाजार भोगावमधील लुटीच्या प्रयत्नाची नोंदच नाही
चार महिन्यांपूर्वी बाजारभोगाव शाखा चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला होता. किरकोळ रकमेसह सीसीटीव्ही फुटेजचा डाटा संकलित करण्याचे मुख्य मशिनच चोरट्यांनी पळविले होते. एवढे होऊनही तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. तशी तक्रार पोलिसांत का दिली नव्हती? याचा तपासही यानिमित्त करण्याची आवश्‍यकता असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

लॉकरमधील चोरीस गेलेल्या सर्व रकमेचा तसेच सर्व तारण ठेवलेल्या सोन्याचा विमा बॅंकेने उतरविलेला आहे, त्यामुळे ग्राहकांनी ठेवीबद्दल तसेच तारण ठेवलेल्या सोन्याबद्दल काळजी करू नये.
- सुबराव पवार,
मुख्य कार्यकारी अधिकारी, यशवंत बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com