कात्यायनी मंदिरातील चोरीचा अवघ्या काही तासात छडा

कात्यायनी मंदिरातील चोरीचा अवघ्या काही तासात छडा

इचलकरंजी - कोल्हापुरातील कळंबा कात्यायनी येथील कात्यायनी देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. अवघ्या काही तासांत चोरीचा छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. 

चोरीस गेलेला ६० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला; मात्र चोरटा सूरज तानाजी काळे (रा. दौंड, जि. पुणे) पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. तो पोलिस रेकॉर्डवरील असून, यापूर्वी त्याने गडहिंग्लज येथील मंदिरात चोरी केली होती.
कात्यायनी देवीच्या मंदिरातील लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो वजनाचे दागिने लंपास केले होते. काल रात्री घडलेल्या या प्रकाराची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली होती. याची माहिती मिळताच येथील स्थानिक गुन्हे शाखेने शोधमोहीम सुरू केली. रेकॉर्डवरील चोरटा सूरज काळे वंदूर (ता. कागल) येथे कुलकर्णी पोल्ट्री फॉर्मजवळ असल्याचे पथकाला आढळले.

पोलिस दिसताच काळेने हातातील कापडी पिशवी टाकून उसाच्या फडात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला; मात्र तो पसार झाला. हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये चांदीचा मुखवटा, घंटी, धुपारती, गोंडे, चवऱ्या आदी साहित्याचा समावेश आहे. हे सर्व संस्थानकालीन साहित्य स्थानिक गुन्हा शाखेने करवीर पोलिस ठाण्याकडे जमा केले. चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. 

कारवाईत स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमोल माळी, हवालदार महेश कोरे, वैभव दड्डीकर, शहनाज कनवाडे, लता राऊत, रणजित पाटील, विजय तळसकर, राजू पट्टणकुडे, ज्ञानेश्‍वर बांगर, रविराज कोळी, संजय फडतरे, सागर पाटील, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, संजय इंगवले, आयूब गडकरी, संदीप मळघणे, अजिंक्‍य घाटगे आदींनी भाग घेतला.
 
बालिंगा येथील रामचंद्र विष्णू गुरव मंदिराचे पुजारी आहेत. ते कुटुंब मंदिर परिसरातच राहते. आज पहाटे नेहमीप्रमाणे ते मंदिरात पुजेसाठी आले, तेव्हा मंदिरातील लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. दर्शन मंडपातील छोटे लाकडी दरवाजे व लोखंडी कपाट उचकटले होते. घटनास्थळी करवीरचे उपअधीक्षक सूरज गुरव, निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह गुन्हे शोधपथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी मंदिरातील दोन चांदीची ताटे, देणगीची काही रक्कम, तसेच पितळी भांड्यांना हात लावलेला नाही. श्‍वान पथकातील श्‍वानाने मंदिरापासून मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला.

सीसीटीव्ही बंद
देवस्थान समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मंदिराचा परिसर निर्जन आहे. मंदिरात सुरक्षारक्षकही नाही. पुजारी गुरव यांनी स्वतः सहा कॅमेऱ्यांची सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बंद आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com