#KolhapurFloods पुरग्रस्तांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला; एक किलो सोन्याचे दागिने लंपास 

#KolhapurFloods पुरग्रस्तांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला; एक किलो सोन्याचे दागिने लंपास 

कोल्हापूर - पुरग्रस्तांची बंद घरे फोडून चोरट्यांनी हात साफ केल्याचे अनेक प्रकार आज उघडकीस आले. यात दोन मोठ्या घरफोड्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी कसबा बावडा माळी मळा येथील घरातून 82 तोळे वजनाचे तर लक्ष्मीपुरीतील घर फोडून त्यातील 14 तोळे असे सुमारे एक किलो सोन्याच्या दागिन्यासह चांदीचा ऐवज व 50 हजाराची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. याबाबतची शाहूपुरी व लक्ष्मीपुरीत नोंद झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महापूराच्या विळख्यात रमणमळा, मुक्त सैनिक वसाहत, घोडकेवाडी, जाधववाडी, बापट कॅंम्प, नागाळा पार्क, लक्ष्मीपुरी आदी शहरातील भागही अडकला आहे. पुराचे पाणी थेट घरात शिरल्याने नागरिकांना घराला कुलूप लावून स्थलांतरित व्हावे लागले. अशा परिस्थितीत मदतकार्याचा बहाणा करत तराफाचा आधार घेत चोरट्यांनी पुरात अडकलेले बंद फ्लॅट, घरे, बंगले फोडून हात साफ केले. याबाबत अनेक तक्रारी पोलिसात दाखल झाल्या. मात्र पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना व पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यात अडथळे येत असल्याने अद्याप अनेक चोऱ्या उघड झालेल्या नाहीत.

कसबा बावडा येथील माळी मळा येथे सुर्यकांत विठ्ठल माळी हे आणि शेजारी त्यांचे चुलत भाऊ मिलींद माळी कुटुंबासोबत राहतात. महापुराचे पाणी त्यांच्या घरात पाच ऑगस्टला शिरले. तसे ते भावासह स्थलांतरीत झाले. दरम्यान पुराच्या चार ते पाच फुट पाण्यातून माळी बंधुंच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी व लोखंडी कपाटे चोरट्यांनी उचकटली. त्यातील सुर्यंकात माळी यांच्या घरातील 82 तोळ्याहून अधिकचे सोन्याचे दागिने आणि 50 हजाराची रोकड लंपास केली. आज दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची फिर्याद सुर्यकांत माळी यांनी शाहूपुरी पोलिसात दिली. 

दरम्यान, अमोल मनोहर कांबळे हे लक्ष्मीपुरी मॉल शेजारी कुटुंबासोबत राहतात. ते औषध दुकानात काम करतात. त्यांची आई ही सावित्रीबाई हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत. मंगळवारी पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरले. तसे त्यांनी घरातील साहित्य व किमंती ऐवज पहिल्या मजल्यावरील तिजोरीत ठेवला. त्यानंतर ते घराला कुलूप लावून जवळच्या श्रमिक हॉलमध्ये स्थलांतरित झाले. पुराच्या पाण्यातून चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील तिजोरी फोडून त्यातील 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्ती, दागिने लंपास केले. तसेच कपाटात कांबळे यांची आई व भाचा यांच्या पगाराचे 18 हजाराची रोकडही लंपास केली.

आज पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरल्यानंतर कांबळे यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. उत्तरेश्‍वर पेठ येथे पुरात अडकलेली दोन घरेही फोडण्यात आल्याच्या तक्रारी पोलिसात आल्या आहेत. त्याची शहानिशा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com