माडग्याळमध्ये बीअरबारवर दरोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

माडग्याळ - माडग्याळ (ता. जत) येथील जत-चडचण रस्त्यालगत असलेल्या बीअरबारचे कुलूप तोडून बारमालक आणि कामगारांना मारहाण करून चोरट्यांनी दारूचे बॉक्‍स व रोख रक्‍कम असा दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी रात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली.

माडग्याळ - माडग्याळ (ता. जत) येथील जत-चडचण रस्त्यालगत असलेल्या बीअरबारचे कुलूप तोडून बारमालक आणि कामगारांना मारहाण करून चोरट्यांनी दारूचे बॉक्‍स व रोख रक्‍कम असा दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी रात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली.

दरम्यान, या परिसरात गस्तीवर असणाऱ्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला भरधाव जाणारी जीप दिसली. संशय आल्याने पथकाने पाठलाग केला असता जीपमधील दरोडेखोरांनी दारूच्या बाटल्या फेकल्या. अखेर कोळगेरीजवळ जीप पलटी झाली. त्यावेळी त्यामधील दोन दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर पाच जण पळून गेले. 

बापू नाना सावंत यांचे गावालगत बीअरबार हॉटेल आहे. काल रात्री बार बंद करून सावंत व कामगार संपत प्रकाश भोकरदन असे युवराज परमिट रूममध्ये झोपले होते. मध्यरात्री बारचा मुख्य दरवाजा तोडून दरोडेखोर आत गेले. त्यांच्या हातात तलवार व लोखंडी रॉड होते. आवाजाने झोपलेले सावंत, भोकरदन दोघेही जागे झाले. दरोडेखोरांनी त्यांना हाताने मारहाण केली. ठार मारण्याची धमकी देऊन स्टोअररूमचे कुलूप तोडले. त्यातून देशी-विदेशी दारूचे २८ बॉक्‍स (त्याची किंमत दोन लाख बावीस हजार तीनशे वीस रुपये होते) आणि रोख अठरा हजार रुपये पळविले.

दरोडेखोरांची जीप (एमएच १० एएन २९३६) गावापासून काही अंतरावर द्यामव्वा ओढ्याशेजारी असणाऱ्या उसात लावली होती. दरोडेखोरांनी दारूचे बॉक्‍स जीपमध्ये ठेवले. त्याठिकाणी दारू पिऊन त्यांची जीप भरधाव वेगाने जतकडे निघाली. दरम्यान, माडग्याळ येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांचे पथक गस्तीवर होते. भरधाव जाणारी जीप त्यांना दिसली. संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला. दरोडेखोरांना हे लक्षात आल्यावर त्यांनी पथकाच्या दिशेने दारूच्या बाटल्या फेकल्या. कोळगेरी गावाजवळ वळण घेत असताना दरोडेखोरांची जीप पलटली. तेव्हा दत्तात्रय रामू चव्हाण (वय २८) आणि दिगंबर रामू चव्हाण (वय २५, दोघेही रा. उमराणी रोड पारधी तांडा, जत) यांना पोलिसांनी पकडले. उर्वरित पसार झाले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, हवालदार प्रवीण शिंदे, कर्मचारी श्री. जाधव, श्री. बर्डे, श्री. यादव, श्री. शिरोळकर, श्री. नलवडे, सुनील लोगंडे, चालक सतीश सूर्यवंशी यांनी केली. 
उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विटा विभागाचे पोलिस उपाधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. सर्व दरोडेखोरांना लवकरच अटक करू, असे भगवान शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूरहून श्‍वानपथक आले. श्‍वानाने बीअरबारपासून शेतात दरोडेखोरांची जीप थांबल्यापर्यंतचा माग दाखवला.

Web Title: robbery in Madgyal