मिरजः मल्लेवाडीतील पाटील वस्तीवर दरोडा

प्रमोद जेरे
शनिवार, 12 जानेवारी 2019

मिरज - येथील मल्लेवाडी गावानजिक बेडग मालगाव रस्त्यावर पाटील वस्तीवर दहा ते आकरा दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. यात दरोडेखोरांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लुटून नेला. 

मिरज - तालुक्‍यातील मल्लेवाडीत बारा जणांच्या टोळीने पाटील वस्तीवरील घरावर दगडफेक करत सशस्त्र दरोडा टाकत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. 

दरम्यान, दरोडेखोर कलियुग ऊर्फ कल्ल्या सुनील भोसले (वय ३५, रा. वड्डी) याला पोलिसांनी सहा तासांत अटक केली. त्याला पकडताना त्याच्या नातेवाइकांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी किशोर कदम, विनोद कदम जखमी झाले. महावीर बाळासाहेब पाटील (वय २७), जयश्री बाळासाहेब पाटील (वय ४७, रा. पाटील वस्ती) यांच्यावरही हल्ला चढविण्यात आला. दरोडेखोरांची ही टोळी बेळंकी येथील दोन महिलांच्या खुनात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

मालगाव-बेडग रस्त्यावर मल्लेवाडीनजीक बाळासाहेब पाटील यांच्या शेतातील घराच्या खिडक्‍यांवर रात्री साडेबाराच्या सुमारास बॅटऱ्यांचे प्रकाशझोत पडू लागल्याने पाटील यांची मुले महावीर आणि राहुल यांनी घराबाहेर येऊन आरडाओरड केली. शेजारील वस्त्यांवरील लोकांना जागे केले. त्यानंतर पाटील कुटुंबीयांनी घराचे दार लावून घेतले. या वेळी दरोडेखोरांनी घरावर दगडफेक सुरू केली. यात खिडक्‍यांच्या काचा फुटल्या.

पाच ते सहाजणांनी घराच्या मुख्य दारावर मोठे दगड घालण्यास सुरवात केली. महावीर आणि राहुल यांनी हा दरवाजा आतील बाजूने घट्ट दाबून धरला तरीही दगडांचा मारा सुरूच राहिला. तुटलेल्या दरवाजातून दरोडेखोरांनी चाकूने महावीर याच्या मांडीवर वार केला. दगडाच्या माऱ्यात दरवाजा निखळला. त्यानंतर दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला आणि घरातील चौघांनाही काठीने मारहाण केली. राजश्री बाळासाहेब पाटील त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र, कानातील झुबे काढून घेतले. दरोडेखोर एकमेकांशी मराठीमध्ये बोलत होते. त्यांनी राजश्री पाटील यांच्याकडून कपाटाची किल्ली हिसकावून घेतली आणि कपाटातील साहित्य विस्कटून त्यातील आठ हजाराची रोख रक्कम आणि चांदीच्या वस्तूंसह किरकोळ दागिने चोरले. 

दरम्यान, पाटील यांच्या घराकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांवर काही दरोडेखोर शेतात दबा धरून बसले होते. त्यांनी पाटील यांच्या घराकडे येणाऱ्यांना दगडफेक करून थोपवून धरले. एक तास धुमाकूळ घालून दरोडेखोर टाकळीमार्गे वड्डीकडे पळाले. शेजाऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात कळवले. पोलिसांची गाडी याच परिसरात गस्तीवर होती.

गाडीच्या आवाजामुळे दरोडेखोरांच्या टोळीने वेगाने वड्डीकडे पळ काढला. प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक दिलीप टिपरसे हे दीड वाजता घटनास्थळी आले. श्‍वानपथकही दाखल झाले. दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्‍या कलियुग ऊर्फ कल्ल्या हा वस्तीनजीकच्या उसात लपून बसल्याचा अंदाज आल्याने त्याला फडात घुसून पकडताना पोलिसांची झटापट झाली. त्याला पकडल्याचे समजताच वस्तीवरील महिलांनी दंगा सुरू केला. त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यात विनोद कदम या कर्मचाऱ्याला डोक्‍यात दगड बसला. तर किशोर कदम या कर्मचाऱ्याच्या डाव्या हाताचा महिलांनी जोरात चावा घेतला. तरीही पोलिसांनी कल्ल्या ऊर्फ कलियुगला पकडून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. चौकशीत तो दुहेरी खुनात सहभागी असल्याचे समोर आले. 

घटनाक्रम असा
- गुरुवारी रात्री ११.३० वाजता अमर पाटील यांच्या पेट्रोलपंपानजीक दरोडेखोरांकडून वाटमारीचा प्रयत्न
- रात्री बारा वाजता भटकी कुत्री जास्त भुंकू लागल्याने वाटमारी सोडून दरोडेखोर पाटील वस्तीकडे 
- रात्री एक वाजता शेतातून वाट काढत दरोडेखोर वड्डीकडे 
- पहाटे सव्वा ते दीड दरम्यान पोलिस पथक घटनास्थळी दाखल
- दोन वाजता श्‍वानपथकाद्वारे तपास. साडेतीनला श्‍वान टाकळी चौकातील वर्धमान पेट्रोल पंपासमोर घुटमळले
- पहाटे साडेतीन ते पाच पोलिसांकडून परिसराची नाकाबंदी
- सकाळी सहा वाजता वड्डीमध्ये पोलिसांचा संशयिताच्या वस्तीवर छापा

पाच महिलांना अटक
दरोड्यातील संशयित कलियुग ऊर्फ कल्ल्या सुनील भोसले याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या जानकी गौंडा भोसले, छायाक्का सुनील भोसले, छाया हृषिकेश पवार, शोभा अशोक भोसले सह आणखी एका महिलेला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Robbery in Mallewadi Patil vasti in Miraj