गरीब नवाज एक्‍स्प्रेसमध्ये साताऱ्यात भरदिवसा लूट

गरीब नवाज एक्‍स्प्रेसमध्ये साताऱ्यात भरदिवसा लूट

मिरज - बंगळूरहून अजमेरला जाणाऱ्या गरीब नवाज एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यात कराड-सातारा दरम्यान सहा जणांच्या टोळीने दिवसाढवळ्या सहा-सात प्रवाशांना बेदम मारहाण करून त्यांचा हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. रेल्वे सुरक्षा बल, पुणे लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवून टोळीतील तिघांना जेरबंद केले. सागर संजय शिंदे (वय २७), अजय शिवाजी चव्हाण (वय २१) आणि सूरज राजेंद्र कणसे (वय २०, तिघेही सातारा) अशी त्यांची नावे आहेत. टोळीतील तिघांचा अजून शोध लागलेला नाही. मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

पुणे रेल्वे पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने छडा लावण्याचे आदेश मिरज रेल्वे पोलिसांना दिले. रेल्वे सुरक्षा बलही या प्रकाराने हादरले. रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दिवसाच्या गाड्यांतील प्रवाशांच्या सुरक्षेसह गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. 

बंगळूरहून अजमेरला जाणारी गरीब नवाज एक्‍स्प्रेस ही गाडी शुक्रवारी दुपारी एक वाजता मिरजेतून सुटली. दोन वाजता कराडमध्ये येताच या टोळीने गाडीच्या सर्वसाधारण डब्यात प्रवेश केला. सातारा येईपर्यंत गाडीतील बिहारी प्रवाशांशी भांडण काढून सहा-सात जणांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील हजारो रुपये लंपास केले. त्यांना दोन डब्यांमधील जागेत नेऊन काहीजणांकडील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर साताऱ्यात उतरून पलायन केले. पुण्यात याची माहिती संबंधित प्रवाशांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने या दरोडेखोरांच्या तपासाचे आदेश मिरज रेल्वे पोलिसांना दिले. पुणे लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शोध घेतला. त्यानंतर टोळीतील सहा जणांपैकी तिघांना काही तासांत अटकही केली. सर्व गुन्हेगार साताऱ्यातील आहेत. त्यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडी, रस्त्यावर लूटमार, मारामारी, चाकू हल्ला असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com