राजोपाध्येनगरात घरफोड्यास रंगेहाथ पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - राजोपाध्येनगरात बंद घर फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यास मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. सुनील शिवाजी शिंदे (वय ५५, रा. रिंगरोड, फुलेवाडी) असे  संशयित चोरट्याचे नाव आहे. 

कोल्हापूर - राजोपाध्येनगरात बंद घर फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यास मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. सुनील शिवाजी शिंदे (वय ५५, रा. रिंगरोड, फुलेवाडी) असे  संशयित चोरट्याचे नाव आहे. 

राजोपाध्येनगरात निळकंठ भालचंद्र अष्टेकर (४६) हे कुटुंबासोबत राहतात. ते काल (ता. १८) कुटुंबासोबत नातेवाइकांच्या घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्री त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोटरट्याने प्रवेश केला. घरातील कपाट फोडून तो किमती ऐवजावर हात मारू लागला. त्या वेळी झालेल्या आवाजाने शेजारी सुतार कुटुंबाला याची कुणकूण लागली. त्यांनी याची माहिती फोनवरून जुना राजवाडा पोलिसांना दिली. तसे पोलिस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी हवालदार दिलीप ईदे, गौरव शिंदे, राजू कांबळे, केशव राठोड, चालक तानाजी कांबळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना अष्टेकर यांच्या घरात चोरटा घरफोडी करत असल्याचे लक्षात आले.

डांगे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने घराभोवती सापळा लावला; मात्र हे चोरट्याच्या लक्षात आले. त्याने घरातील २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, पाच हजार रुपयांचा टॅब, चांदीची मेखला, चांदीचा हार, चमचे, उदबत्ती स्टॅंड, करंडा, निरंजन, पान, फूल असे २० हजारांचे दागिने, अर्धा तोळ्याची सोन्याची कर्णफुले, तीन हजारांचे लहान मुलाचे दागिने आणि २३० रुपयांची रोकड असा ६३ हजार २३० रुपयांचा ऐवज घेऊन पाठीमागच्या दारातून पळ काढला. दबा धरून बसलेल्या डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीत त्याने नाव सुनील शिंदे असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून स्क्रूड्रायव्हर, कटावणी व पाना ताब्यात घेतला. याबाबत अष्टेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल केला. संशयित शिंदेला अटक करून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. पोलिसांना महेश सुतार व राहुल सुतार या नागरिकांनी मदत केली.

गुन्ह्याची पद्धत अशी...
बंद घर रात्री मोटारसायकलवरून हेरायचे. घरापासून दूर अंतरावर मोटारसायकल उभी करायची. त्यानंतर ते घर फोडून चोरी करत असल्याचे संशयित सुनील शिंदेने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राजोपाध्येनगरातून मोटारसायकलही ताब्यात घेतली आहे. त्याचीही पोलिसांची चौकशी सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in RajopadyeNagar in Kolhapur