तोडकरी, गाडीवाल्यांकडून लूट; ऊस उत्पादक कंगाल

अजित झळके
Wednesday, 2 December 2020

शेतकऱ्यांना चारही बाजूंनी लुटले जात आहे. त्यात आता कष्टकरी वर्ग म्हणवल्या जाणाऱ्या ऊस तोडकरी आणि गाडीवान, ट्रॅक्‍टरचालकांनीही या शेतकऱ्यांनाच लुटण्याचा धंदा सुरू केला आहे.

सांगली : शेतकऱ्यांना चारही बाजूंनी लुटले जात आहे. त्यात आता कष्टकरी वर्ग म्हणवल्या जाणाऱ्या ऊस तोडकरी आणि गाडीवान, ट्रॅक्‍टरचालकांनीही या शेतकऱ्यांनाच लुटण्याचा धंदा सुरू केला आहे. ही लूट आजवर "खुशी' होती. आता ती सक्ती झाली आहे. एकरी पाच ते दहा हजार रुपये तोडकऱ्यांना आणि हजार रुपये वाहतूकदारांना, तर चार हजार रुपये तोडणी यंत्राला सक्तीने मागितले जात आहेत. साखर कारखाने एफआरपीतून तोडणी आणि वाहतूक वजा करूनच बिले अदा करत असताना पुन्हा ही रक्कम का द्यायची? याबाबत एकही शेतकरी संघटना बोलायला तयार नाही. 

आधीच बहुतांश कारखाने एफआरपी देताना तुकडे करत आहेत. तुकडे करायलाही हरकत नाही; मात्र शेवटचा हक्काचा तुकडा मिळेल, याची खात्री राहिलेली नाही. त्यात आता तोडकरी, वाहतूकदारांनी रक्त प्यायला सुरवात केली आहे. फडात तोड घालायची असेल, तर आधी सौद्याला बसायला लागते. एकरी पैसे टाकल्यानंतर मगच कोयता पडतोय. वर्षभर ऊस पिकवायचा शेतकऱ्याने आणि त्याच्या वाड्यावरही शेतकऱ्याचा हक्क असू नये? आम्ही तोडले तर आमचे वाडे, हा कुठला न्याय? साखर कारखानदारांनी त्यांचे एवढे लाड का करावेत? त्यांच्यावर नियंत्रण का नाही? 

खरे तर कुणाच्या शेतात तोड घालायची, याचे वेळापत्रक कारखान्याने ठरवावे. या तारखेला तोड येईल, हे निश्‍चित सांगावे. तोडकऱ्यांना तेथे जायलाच हवे. त्यांचा कारखान्यांशी करार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी का रांगेत थांबायचे, तसेच का सौदा करायचा? उसाचा दर देताना आधी शिमगा, त्यात काटामारी, त्यात उतारा टक्‍क्‍यांत हाणामारी आणि आता हा नवा लुटीचा धंदा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. 

का चालवलीय लूट? 

  • यंदा उसाचे क्षेत्र जास्त 
  • तोडकरी संख्या 35 टक्‍क्‍यांनी कमी 
  • तोडणी यंत्रांची संख्या मोजकीच 
  • शेतकरी नडलाय, याची पक्की खात्री 

लुबाडणूक सहन करणार नाही

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता कष्टकरी वर्गही खिंडीत गाठत आहे, हे अधिक दुर्दैवी आहे. कारखानदार लुबाडायला लागले तर त्यांच्यावर दगड फेकता येतात. आता या कष्टकऱ्यांशी संघर्ष कसा करायचा? पण यातून मार्ग काढावा लागेल. शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा थांबवावा लागेल. त्यासाठी कारखानदारांनी आणि सरकारने तत्काळ धोरण ठरवावे. अन्यथा, शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. एक वेळ ऊस फडात पेटला तरी चालेल; पण तो स्वतःची लुबाडणूक सहन करणार नाही. ती वेळ येऊ नये. 
- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी. 

कारखानदारांनी तातडीने नियोजन करावे

टोळ्या कमी आल्या आहेत, ऊस जास्त आहे, त्यामुळे लूट सुरू आहे. हे थांबवायचे असेल तर टोळ्यांवरचे अवलंबित्व थांबले पाहिजे. त्याचप्रमाणे यंत्राने तोडी वाढवायला हव्यात. त्यासाठी कारखानदारांनी तातडीने नियोजन करावे. 
- संजय कोले, नेते, शेतकरी संघटना. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery from sugar cutters & vehicle owners; Sugarcane growers are poor