रोहित पवारांचे ठरले; पक्षाकडे मागितली विधानसभेसाठी उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

रोहित पवार यांचे ठरले असून त्यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अधिकृतरित्या उमेदवारी मागितली आहे. पक्षाने संधी दिली तर विधानसभा निवडणूक लढवेन, असे आतापर्यंत राजकीय उत्तर देणाऱ्या रोहित यांना पक्ष संधी देणार का, याची उत्सुकता आहे.

नगर : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचे ठरले असून त्यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अधिकृतरित्या उमेदवारी मागितली आहे. पक्षाने संधी दिली तर विधानसभा निवडणूक लढवेन, असे आतापर्यंत राजकीय उत्तर देणाऱ्या रोहित यांना पक्ष संधी देणार का, याची उत्सुकता आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असलेले रोहित हे गेले काही दिवस नगरमध्ये ठाण मांडून होते. पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर त्यांनी टीका करून आपले राजकीय अस्तित्त्व दाखवून दिले होते. मात्र ते पुणे शहरातील हडपसर की नगरमधील कर्जत विधानसभा मतदारसंघातून  उभे राहणार, याची उत्सुकता होती. हडपसरमधून पक्षातील सात इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यात रोहित यांचे नाव नाही.

कर्जतमध्ये नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड आणि बाबासाहेब गांगर्डे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाने राज्यभरातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सांगितले होते. काहींनी थेट प्रदेश कार्य़ालयात तर काहींनी जिल्हा कार्यालयात अर्ज दाखल केेले. रोहित यांनी पक्षाच्या नगर जिल्हा कार्यालयाकडे अर्ज सादर केला.

शरद पवार यांचे दुसरे नातू व अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून राजकीय जीवनाची सुरवात करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आले. रोहित यांनी जिल्हा परिषदेपासून सुरवात केली. आता नवीन जबाबदारी घेण्याच्या तयारीला ते लागले आहेत. त्यामुळे कर्जतमध्ये भाजपकडून मंत्री राम शिंदे विरुद्ध रोहित, असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit pawar demands Vidhansabha ticket in karjat