"हा' अभिनेता सांगणार, कर्जत-जामखेडची महती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

गावोगावच्या तीर्थस्थळांची माहिती कागदपत्रांसह गोळा केली जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. 

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्‍यातील ऐतिहासिक, तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची महती अभिनेता मिलिंद गुणाजी भटकंतीच्या माध्यमातून सांगणार आहे. या उपक्रमामुळे दोन्ही तालुक्‍यांतील ही स्थळे जागतिक स्तरावर जातील. त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होईल, तसेच संबंधितांना उत्पन्नाचा स्रोतही तयार होईल. 

milind gunaji

अवश्‍य वाचा : शेतकऱ्यांनी कांदालिलाव बंद पाडले 

गावोगावच्या तीर्थस्थळांची माहिती कागदपत्रांसह गोळा केली जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. 

जामखेड येथे आमदार रोहित पवार यांनी आज तालुक्‍यातील पर्यटन व तीर्थस्थळांची, साधूसंतांच्या संजीवन समाधिस्थळांची माहिती जाणून घेतली. यासाठी आयोजित बैठकीला अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्‍यातील खर्डा येथील बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरे, भुईकोट किल्ला, चौंडी येथील अहल्याबाई होळकर जन्मस्थळ व महादेव मंदिर देवस्थान, जामखेड येथील नागेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, 
विविध ठिकाणची ग्रामदैवते, संजीवन समाधिस्थळाची माहिती कार्यकर्त्यांनी सादर केली.

rohit pawar

जामखेड : तालुक्‍यातील तीर्थस्थळे, पर्यटनस्थळांची माहिती कार्यकर्त्यांकडून जाणून घेताना आमदार रोहित पवार.  

श्रद्धास्थळांच्या विकासाचा प्रयत्न 

आमदार पवार म्हणाले, ""तालुक्‍याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी तालुक्‍यात असलेल्या पर्यटन व तीर्थक्षेत्रांची माहिती सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या माध्यमातून समोर आणणार आहोत. तसेच, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येथे विकास केला जाईल. पर्यटकांच्या माध्यमातून रोजगारवृद्धी कशी होईल, यावर आपला भर राहील.

हेही वाचा : शिर्डी विमानतळ बुधवारपासून सुरू 

आपल्या तालुक्‍यात असलेल्या संजीवन समाधीचा, संत-महात्म्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी तो संकलित करून, प्रेरणा व श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा आपला प्रयत्न राहील.'' या वेळी सूर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, मनोज भोरे, प्रदीप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar's concept for tourism development