रोहित शर्माची अकॅडमी शोधणार सांगलीतील 'क्रिकेट टॅलेंट'!

अजित झळके
Monday, 28 September 2020

छोटी शहरे आणि ग्रामीण भागात क्रिकेटमधील गुणवत्तेला पुरेपूर वाव देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी फलंदाज रोहिम शर्माने मोहीम राबवली आहे. त्यात सांगली, मिरजेसह परिसरातील क्रिकेटमधील गुणवत्ता शोधली जाणार आहे.

सांगली : छोटी शहरे आणि ग्रामीण भागात क्रिकेटमधील गुणवत्तेला पुरेपूर वाव देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी फलंदाज रोहिम शर्माने मोहीम राबवली आहे. त्यात सांगली, मिरजेसह परिसरातील क्रिकेटमधील गुणवत्ता शोधली जाणार आहे. येथील शिंदे मळ्यातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये रोहित शर्मा, क्रिक किंगडम आणि सुमित स्पोर्टस्‌ यांची संयुक्त ऍकॅडमी सुरू झाली आहे. 

श्री. वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष समीर बिरनाळे, श्रीनिवास मानधना, क्रिक किंगडम इंडियाचे प्रमुख पराग दहिवाल, प्रशिक्षक सुमित जंगम यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. रणजी एकदिवशी महाराष्ट्र संघातून खेळलेले सुमीत चव्हाण आणि प्रशांत कोरे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वागत केले.

अकॅडमीत सरावासाठी चार टर्फ विकेट, एक ऍस्ट्रो टर्फ विकेट, सामन्यासाठी तीन विकेट आहेत. विशेष शिबिर, तंदुरुस्तीवर भर, क्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शन, व्हिडिओव्दारे संवाद, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दौरे होतील. खेळाडूच्या वाटचालीची इत्भूंत माहिती पालकांना ऑनलाईन मिळेल, सराव सत्रांना हजर राहता येईल, असे दहिवाल यांनी स्पष्ट केले. 

नव्या दमाच्या खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण देतानाच त्यांना अधिकाधिक सरावातून स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे सुमित आणि प्रशांत यांनी सांगितले. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संजय बजाज, सचिव रवींद्र बिनीवाले, ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब यांनी ही ऍकॅडमी जिल्ह्यातील गुणवत्तेला न्याय देईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

बिरनाळे स्कूलचे संचालक सागर बिरनाळे, विशाल पवार, प्रितेश कोठारी, राहुल आरवाडे, युसूफ जमादार, रोहन बिनीवाले, शिरीष शेठ, राकेश उबाळे, अश्‍विनी बिनीवाले, अनंत तांबवेकर, प्रकाश फाळके, आर. के. चव्हाण, तानाजीराव कोरे उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma's academy is going to find 'cricket talent' in Sangli