शेटफळे येथील रस्त्याचे काम न करताच काढले रोहयोचे पैसे 

नागेश गायकवाड
Friday, 28 August 2020

शेटफळे (ता. आटपाडी) येथे शिवेचा मळ्याच्या रस्त्याचे काम न करताच रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या चार मस्टर (हजेरीपत्रक) ची बिले काढली आहेत.

आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे शिवेचा मळ्याच्या रस्त्याचे काम न करताच रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या चार मस्टर (हजेरीपत्रक) ची बिले काढली आहेत. त्याची चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणारे निवेदन दिले. शेटफळे येथील शिवेचा मळ्याला जाण्राऱ्या रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून मंजूर आहे. लोकांना ये-जा करताना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत होती. लोक वैतागले होते.

रस्त्याच्या कामासाठी चौकशी केली असता सदर रस्त्याच्या कामाची चार आठवड्याची दहा मजुरांची मास्टर (मजुरी) ची रक्कम काढल्याचे उघड झाले. काम न करताच पैसे काढल्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. सदरचा प्रकार उघड झाल्यानंतर आणि तक्रारीनंतर वाहनांच्या सहाय्याने मुरूम आणून काम सुरू केले. काम केले नसताना बिले काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे. अन्यथा पंचायत समितीसमोर दोषी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करू, असा इशारा देण्यात आला आहे. 

शेटफळेत "रोहयो' तून मंजूर रस्त्याच्या कामासंदर्भात शेतकरी संघटनेने तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन तात्काळ बांधकाम विभागाचे उपअभियंत्यांना चौकशीचे आदेश दिलेत. मस्टर मागणी कोणी केली, कशाचे आधारे केली आणि प्रत्यक्ष काम केले आहे का? याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. 
- पंकज शेळके, प्रभारी गटविकास अधिकारी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohyo's money was withdrawn without working