सांगलीच्या आभाळात भोरड्यांची कवायत

सांगलीच्या आभाळात भोरड्यांची कवायत

सांगलीच्या आकाशात सध्या सकाळ-संध्याकाळ हजारो पक्ष्यांचे थवे आपले लक्ष वेधून घेतात. दरवर्षीचे हे विहंगम दृश्‍य अनुभवण्यासाठी तुम्हाला भल्या सकाळी सांगलीच्या कृष्णाकाठी जावे लागेल. हे पक्षी म्हणजे भोरड्या. ते समूहांनी राहतात. इंग्रजीत त्यांना रोझी स्टारलिंग’ म्हणतात. भारताच्या सरहद्दीच्या बाहेरचे ते रहिवासी. जो पक्षी ज्या प्रदेशात घरटे करतो तो तेथील रहिवासी मानले जाते. 

भोरड्या उत्तरपूर्व युरोप, दक्षिण पश्‍चिम आशिया (आशिया मायनर, मध्य पूर्व, रशिया, तुर्कस्थान) अशा मोठ्या भू भागात घरटी करतात. हिवाळ्यात स्थलांतर करून त्या भारतात येतात. सर्वांत लवकर येणारे हे पक्षी लहान लहान समूहात सर्वत्र पसरतात. भोरड्या ऑगस्ट महिन्यात दिसू लागतात. ऑक्‍टोबर उजाडता उजाडता भोरड्या सर्वत्र पसरतात. मैने एवढा आकार, गुलाबी अंग, डोके, पंख आणि शेपूट काळे अशी त्यांची रंग संगती असते. धान्य, फळे, मधुरस, कीटक असे सर्व प्रकारचे त्यांचे अन्न असते. हे पक्षी पिकावर धाड टाकून ते फस्त करतात. बरीचशी नासाडी करतात. मुख्यतः कीटक हेच त्यांचे खाद्य. त्यात टोळला अधिक पसंती. एका परीने ते कीटक नियंत्रणाचे काम करतात. फुलातील मधुरस खाताना ते परागी भवनास मदत करतात. 

डिसेंबर अखेरीस हे पक्षी विशिष्ट ठिकाणी एकत्र जमू लागतात. छोट्या छोट्या गटात विभागलेले पक्षी संध्याकाळी एकत्र जमू लागतात. रात्रीच्या विश्रांतीसाठी ते जागा निवडतात आणि तेथे रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबतात. सकाळी अन्न शोधण्यासाठी चारीदिशांना पांगतात. हळूहळू हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात. भोरड्यांचा परतीचा काळ सुरू होतो.. एप्रिल महिन्यात त्यांचे थवे परतीला लागतात. त्यावेळी त्यांच्या प्रदेशात  घरटे करण्यास अनुकूल वातावरण तयार झालेले असते. घरटी करून पिलांना जन्म देईपर्यंत हिवाळा अवतरतो आणि ते पुन्हा स्थलांतर....हे त्यांचे जीवनचक्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com