कुजलेल्या कांद्यावर फिरविला नांगर

Rotated plow on roasted onion
Rotated plow on roasted onion

श्रीगोंदे (नगर): कांदा पिकाचे आगर असणाऱ्या श्रीगोंद्यात अतिपावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. तालुक्‍यात सुमारे अकरा हजार हेक्‍टर कांदा पीक पावसामुळे वाया गेले असून, सरकारने केलेल्या पंचनाम्यातून 33 कोटी रुपयांच्या नुकसानीचा आकडा पुढे आला. दरम्यान, टाकळी लोणार येथे कांद्याचे पीक शेतातच नांगरून टाकल्याने यातून शेतकऱ्यांची हतबलता व्यक्त होत आहे. 

श्रीगोंद्यात शेतकरी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. तालुक्‍यातील काही गावे दरवर्षी शेकडो एकर कांद्याची लागवड करतात. काही वेळा तोट्यात गेलेला कांदा अनेक वेळा भरघोस पैसा देऊन जात असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाकडे मोठ्या प्रमाणात कल आहे. यंदा मात्र या पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिपावसामुळे पाणी आणले आहे. अनेक भागात पीक चांगल्या स्थितीत होते. काही गावांमध्ये लागवड करून महिना-दोन महिने झाले होते. मात्र, पावसाने पाठ सोडली नाही आणि कांदा शेतात सोडावा लागला. 

शासनाने केलेल्या पंचनाम्यात या कांदा पिकाचे नुकसान ठळकपणे दिसून येत आहे. भरपाई मिळेल की नाही याची भ्रांत आहे. तालुक्‍यातील टाकळी लोणार येथे गेल्या वर्षी कांद्यातून शेतकऱ्यांनी बारा कोटींपेक्षा जास्त रुपये कमावले होते. यंदा मात्र त्या गावात साडेपाचशे हेक्‍टर कांदा पावसाने वाया गेला आहे. तेथील शेतकरी मुरलीधर कदम यांनी त्यांच्या चार एकर कांद्यावर ट्रॅक्‍टरच्या मदतीने नांगर फिरवला. या पिकासाठी कदम यांनी एक लाख रुपये खर्च केला होता. मात्र, अतिपावसाने कांदा हाती येण्यापूर्वीच हा खर्चही पाण्यात गेला. कदम म्हणाले, ""आता सरकारने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरचे कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करावा.'' 

कांद्याचे 33 कोटींचे नुकसान ः म्हस्के 

तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के म्हणाले, ""तालुक्‍यात तब्बल अकरा हजार हेक्‍टर कांदा पिकाचे शेतातच नुकसान झाले आहे. शेतकरी जरी एकरी चाळीस हजार रुपये कांद्यासाठी खर्च करीत असला, तरी सरकारी हिशेबाप्रमाणे कांद्याचे सुमारे 33 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करीत आहोत.''  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com