...तर आरपीआयही युती करणार नाही

Mahadev-jankar
Mahadev-jankar

कोल्हापूर - तीन वर्षांत पदे देऊनही आपण एक माणूस जोडू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे. रासपची जिल्ह्यात अशीच वाटचाल राहिली, तर मोठे पक्ष सोडा; पण भविष्यात ‘आरपीआय’ही आपल्याशी युती करणार नाही, अशा शब्दांत दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. जानकर यांनी सुमारे दीड तासांच्या भाषणात सर्वच पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. क्रशर चौक परिसरातील केदारनाथ सांस्कृतिक भवन येथे मेळावा झाला.

जानकर यांच्या सडेतोडपणामुळे पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली; मात्र काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पक्ष वाढीसंबंधी मार्गदर्शन करण्याऐवजी पदाधिकाऱ्यांचा पंचनामा केल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. पश्‍चिम महाराष्ट्रप्रमुख माणिकराव दांगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, तैजुद्दीन मणेर आदी उपस्थित होते.

श्री. जानकर यांनी तालुकाध्यक्षांच्या झाडाझडतीस सुरवात केली. ‘गण आणि गटात किती गावे येतात, पक्षवाढीसाठी काय केले?, किती माणसे जोडली, असा सवाल केला. पदाधिकाऱ्यांकडून खुलासा होताच जानकर त्यास उत्तर देत. एका तालुक्‍याचा पदाधिकारी बोलला, की दुसऱ्यांचा नंबर येत होता; मात्र जानकर काय बोलतील, याचा नेम नसल्याने सगळेच चक्रावले. जिल्हाध्यक्ष डॉ. कचरे यांच्यावरही तोंडसुख घेत तातडीने बांधणी न केल्यास जिल्हाध्यक्षांनाही बदलण्याचा इशारा दिला. अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यास तुम्ही सोडून दुसरा नवा माणूस आला नाही, अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.

ते म्हणाले, ‘‘सगळे बिनकामाचे आहात. महत्त्वाची पदे दिली, पण दोन्ही लोकसभा मतदारसंघात काही काम झाले नाही. माझ्यावर प्रेम करू नका, पक्षावर प्रेम करा, थापा मारू नका, पदे दिली, तर हे दिवे लावलेत, डिसेंबरपर्यंत कामात बदल न झाल्यास कार्यकारिणी बदलावी लागेल,’’ असा इशाराही दिला.

अन्‌ जानकरही अवाक झाले
एका तालुकाध्यक्षाला पक्ष वाढीसंबंधी जानकर यांनी विचारणा केली असता, त्याने आपण स्वतः तालुकाध्यक्ष, मुलगा विद्यार्थी अध्यक्ष आणि मेहुणी महिलाध्यक्ष असल्याचे सांगताच जानकर यांनी डोक्‍यालाच हात लावला. शहरात ८१ वॉर्डमध्ये किती माणसे जोडली? असा सवाल त्यांनी केला असता एका पदाधिकाऱ्याने त्याच्या पत्नीने निवडणूक लढविली, पण पदाधिकाऱ्यांची काही नियुक्ती केली नसल्याचे नमूद केले.

अवमान झाल्याने मेळाव्यातून बाहेर
दरम्यान, चंदूरच्या ग्रामपंचायत महिला सदस्येचा अवमान झाल्याने त्या मेळावा मध्येच सोडून रागाने निघून गेल्या. शहर उपाध्यक्ष मुस्ताक मुल्ला यांनी पदाधिकारी, महिला, तसेच पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल पक्षाचा राजीनामा देत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com