दंड आकारण्यासाठी पोलिसांकडे मशिन्स!

Machine
Machine

सातारा - वाहनधारकांनी कायदा मोडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या कागदी पावत्या आता इतिहास जमा होणार असून, लवकरच त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या हाती मशिन्स येणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा पावती पुस्तक सांभाळण्याचा त्रास कमी होणार आहे. त्याबरोबर नागरिकांनाही यातून सुविधा मिळणार आहे.

वाहतूक पोलिसांच्या हातात असलेल्या पुस्तकाची सर्वच वाहनधारकांना धास्ती वाटते. बहुतांश वाहनचालकांनाही भीती वाटते. कारण एकतर त्यांच्याकडे कागदपत्रे अपुरी असतात. लायसन्स असले, तर कागदपत्र नसतात, कागदपत्र असली, तर लायसन्स नसते आणि दोन्ही असले, तर पीयूसी नसते किंवा नंबरप्लेटचा तरी प्रॉब्लेम असतो. त्यामुळे वाहतूक पोलिसाने हात केला, की त्याच्या हातातील पावती पुस्तक बाहेर येते.

त्यानंतर आर्थिक दंड ठरलेलाच असतो. मात्र, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाहतूक पोलिसांनी पावत्या करण्यापेक्षा वाहतूक नियमनाकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी दिसेल त्याला अडवायचे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. त्यामुळे पावत्यांची धास्ती जरा कमी झाली आहे. मात्र, सर्वांच्या मनात धडकी भरवणाऱ्या या पावत्या आता कालबाह्य होणार आहेत.

वाहतूक पोलिसांनाही आता पावती करण्यासाठी मशिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. या मशिनच्या साहाय्यानेच दंड वसूल केला जाणार आहे. या मशिन्समुळे पावसाळ्यामध्ये पावत्या सांभाळण्यासाठी करावी लागणारी पोलिसांची कसरत कमी होणार आहे. त्याचबरोबर या मशिन्समध्ये पावत्या प्रलंबित ठेवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्याचबरोबर एखाद्याकडे रोख पैसे नसल्यास एटीएम कार्डच्या साहाय्याने पैसे भरून घेण्याची सुविधाही यात उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पैसे नसल्यामुळे गाडी ओढून नेण्याची पद्धत थांबणार आहे. नवीन मशिन्स चालविण्याबाबत नुकतेच वाहतूक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आता सर्वांना मशिन्स येण्याची प्रतीक्षा आहे. मशिन्स आल्यानंतर सध्याच्या पावत्या बंद करून मशिन्सचे दंड वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com