सोलापूर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय समस्यांच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सोलापूर : लिलावाच्या प्रतीक्षेत असलेली जुनी वाहने, मैदानातील खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी, चाचणी ट्रॅकवर पडलेली भेग, जागोजागी साचलेला कचरा, पान, गुटखा खाऊन थुंकल्याने रंगलेल्या भिंती, हे चित्र आहे विजापूर रोड परिसरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे.

सोलापूर : लिलावाच्या प्रतीक्षेत असलेली जुनी वाहने, मैदानातील खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी, चाचणी ट्रॅकवर पडलेली भेग, जागोजागी साचलेला कचरा, पान, गुटखा खाऊन थुंकल्याने रंगलेल्या भिंती, हे चित्र आहे विजापूर रोड परिसरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे.

अनेक समस्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ग्रासले आहे. 
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश करतानाच मोठा खड्डा आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना जपूनच आत जावे लागते. प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला दुचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था आहे, पण पावसाळ्यात या ठिकाणी चिखल होता. मातीमध्ये वाहने अडकून पडतात, त्यामुळे वाहने लावताना आणि काढताना खूपच त्रास होतो. वाहन चाचणीचा ट्रॅक दुरून व्यवस्थित दिसत असला तरी एक-दोन ठिकाणी भेग पडली आहे.

ट्रॅकवरील गतिरोधकाला पट्टे मारण्याची आवश्‍यकता आहे. परिसरात जागोजागी कचरा साचला आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले कर्मचारी कार्यालय आणि परिसरात स्वच्छता करतात. पण कार्यालयाचा संपूर्ण परिसरात अपेक्षित स्वच्छता होत नाही. कार्यालयाजवळच जप्त केलेली जुनी वाहने ठेवली आहेत. रिक्षा, कार, ट्रक यासह इतरही वाहने लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षांपूर्वी आग लागून जुनी वाहने जळाल्याची घटना घडली होती. परिसरात अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांसह दारूच्याही बाटल्या दिसून आल्या. सुरक्षा व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी तळीरामांच्या पार्ट्या होत आहेत. 

घडल्या आहेत चोरीच्या घटना 
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातून अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. जप्त करून आणून मैदानात लावलेली वाहने, त्यांचे साहित्य चोरीला गेले आहे. या परिसरात सुरक्षेसाठी कोणीच दिसून येत नाही. या परिसरात सुरक्षारक्षकांची आवश्‍यकता आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करेपर्यंत कोणीच विचारत नाही. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात खड्डे असल्याने पाणी साचते, हे खरे आहे. त्या ठिकाणी माती आणि मुरूम टाकण्यात येईल. स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण कार्यालय परिसर आणि मैदानाची स्वच्छता करून घेण्यात येईल. 
- अशोक पवार, 
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: rto of solapur in bad condition