सत्ताधारी ही फसवणूक करणारी टोळी - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

इस्लामपूर - सत्ताधाऱ्यांनी 31 वर्षांच्या निवडणुकीतील आश्‍वासनांची व जाहीरनाम्यांची याही निवडणुकीत त्याच विषयांची फेरमांडणी करून जनतेची चेष्टा केली आहे. शहरात सत्ताधाऱ्यांची टोळी फसवणूक करणारी टोळी, अशी ओळख त्यांच्या कर्तृत्वामुळेच झाली. जनता आता त्यांना माफ करणार नाही, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

इस्लामपूर - सत्ताधाऱ्यांनी 31 वर्षांच्या निवडणुकीतील आश्‍वासनांची व जाहीरनाम्यांची याही निवडणुकीत त्याच विषयांची फेरमांडणी करून जनतेची चेष्टा केली आहे. शहरात सत्ताधाऱ्यांची टोळी फसवणूक करणारी टोळी, अशी ओळख त्यांच्या कर्तृत्वामुळेच झाली. जनता आता त्यांना माफ करणार नाही, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

येथील नगरपालिका निवडणुकीसाठी विकास आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 9 व 10 मध्ये आज झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्षपदाचे उमेदवार निशिकांत पाटील, राहुल महाडिक, एल. एन. शहा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, बाळासाहेब पवार, सुभाष शिंगण, विजय पवार, अरुण कांबळे, सतीश महाडिक उपस्थित होते.

मंत्री खोत म्हणाले, 'स्व. एम. डी. पवारसाहेब व स्व. अशोकराव पवार यांचा शहराच्या विकासात मोलाचा वाटा आहे. या व्यक्तिमत्त्वांनी शहराच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून जीवाभावाचं नातं निर्माण केलं.

सत्ताधारी मंडळी, "वापरा आणि फेका' या संस्कृतीत अडकली आहेत. या सर्व सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला लगाम घालण्यासाठी विकास आघाडीच्या कर्तबगार उमेदवारांना निवडून द्यावे, सत्ताधाऱ्यांनी व मंत्र्यांनी सत्तेच्या काळात अधिकाऱ्यांना गुलामासारखी वागणूक देऊन सत्तेचा गैरवापर केला व शहरातील गोरगरीब जनतेवर अन्याय केला.'' आमदार नाईक म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांची उमेदवार मिळवताना शेवटच्या क्षणापर्यंत दमछाक झाली. शहराचा सर्वांगीण विकास केला असता तर आज तुम्हाला जाहीरनामासुद्धा छापायची आवश्‍यकता भासली नसती. 31 वर्षांत कुरघोड्या, संपत्ती लाटणे व टोळीपुरताच विकास या सत्ताधाऱ्यांनी साधला. शहराच्या राजकारणात बाहेरील मंडळी येतात, असा आरोप समोरच्या नेत्यांकडून होत आहे. तर त्यांनी स्वतःचं गाव कोणतं हे सांगावं व दुसऱ्यावर आरोप करावेत.'' राहुल महाडिक, एल. एन. शहा, विजय पवार, सतीश महाडिक यांची भाषणे झाली. पांडुरंग खैरे यांनी स्वागत केले.

बाळासाहेब पवार यांनी आभार मानले. उमेदवार वैभव पवार, मंगल शिंगण, प्रदीप लोहार, सीमा पवार, सागर मलगुंडे, गणेश शेवाळे, शकील सय्यद, राजेंद्र पवार, कुलदीप खांबे, भास्कर कदम, संजय जाधव उपस्थित होते. संजय लाखे यांनी राष्ट्रवादीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करून विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला.

राष्ट्रवादीच्या मंडळींनीच व्यापाऱ्यांना त्रास दिला
निशिकांत पाटील म्हणाले, 'या प्रभागात जैन समाजाची सत्ताधाऱ्यांनी अनेक वर्षे फसवणूक केली. राष्ट्रवादीची मंडळीच गांधी चौकातील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी त्रास देत होते. व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम आम्ही केलं असून स्व. एम. डी. पवार यांचा वारसा या उमेदवारांना लाभला आहे.'

Web Title: That the ruling party of fraud