अफवांमुळे महाबळेश्‍वरच्या पर्यटनावर परिणाम

अभिजीत खूरासणे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

महाबळेश्वर येथे निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी शहर बाराही महिने सज्ज असते. पावसाळी हंगामातही वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांनी कोणतीही काळजी न कारता भेट द्यावी व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटावा. 
- डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष, महाबळेश्वर 
 

महाबळेश्वर ः पुणे - बंगळूर महामार्गावरील वाहतुक अद्याप ही बंद असल्याने तसेच अफवांमुळे सलग तीन दिवस सुट्ट्या (शासकीय सोडून) असून ही महाबळेश्‍वरच्या पावसाळी पर्यटनावर परिणाम झाला आहे. महाबळेश्‍वरमध्ये नेहमीच पावसाचा जोर असतो. आत्तापर्यंत येथे जून महिन्यापासून 5874.04 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्‍वरात पर्यटक उन्हाळ्याबरोबर गेल्या काही वर्षांत पावसाळी पर्यटनास पसंती देऊ लागले आहेत. येथे कोसळणाऱ्या पावसात लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव सोमवारपासून (ता. 5) पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक (अवजड वाहने) बंद ठेवली. पुण्याहून महाबळेश्‍वरला जाणारी प्रवाशी वाहतुक सुरुर फाटा मार्गे असल्याने फारशी अडचण नाही. तसेच पूरस्थितीमुळे कोल्हापूरहून येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.

दरम्यान शुक्रवारपासून (ता.9) सोशल मिडियावर मुसळधार पाऊस असल्याने महाबळेश्‍वर बंद असल्याची अफवा पसरली. त्याचा ही परिणाम महाबळेश्‍वरच्या पर्यटनास बसला आहे. सध्या महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेत तुरळक गर्दी असल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumors affect Mahabaleshwar's tourism