कोरोनाच्या धास्तीत अफवांचेही पेव 

कोरोनाच्या धास्तीत अफवांचेही पेव 

वाळवा : या देशात अफवा जेवढी गतीने पसरते तेवढ्या गतीने सूर्यकिरणेही पृथ्वीवर पोहोचू शकत नाहीत. देश आणि जगात गेल्या महिन्यात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. या भयंकर रोगाचा सामना करण्यासाठी सगळी यंत्रणा डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस राबत आहे. ग्रामपंचायती पासून विधानसभा आणि संसदेपर्यंत सगळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हा रोग पसरू नये म्हणून झटत आहेत. हे चित्र एका बाजूला असताना अफवा पसरवणारेही कोरोनाच्या रुग्णासारखे ठिकठिकाणी आढळत आहेत.

देशात अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली की अफवांचे पीक येते. आणि श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेवर विश्वास असलेली इथली जनताही अफवेचे लगेच अनुकरण करून मोकळी होते. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशीच एक अफवा पसरवण्यात आली होती. त्याचा परिणाम इतका भयंकर वेगाने झाला आहे. की गावागावात आणि घराघरातील महिलांनी गळ्यात हळकुंड बांधले आहे. मंगळसूत्राच्या जोडीला हळकुंड महिलांच्या गळ्यात सरास दिसत आहे.

कोरोनाचे संकट पाहता संचारबंदी, लॉकडाऊन आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र कायद्याचा धाकच नसणारे लोक घरात कमी आणि रस्त्यावर जास्त दिसतात. राज्य आणि देशात मोकाट फिरणाऱ्यांना पोलिस फोडून काढत आहेत. त्याचे व्हीडीओ व्हायरल होत आहेत. तरीही लोकांना घरात बसू वाटत नाही. सरकारी आदेश मोडण्यासाठी असतो ही मानसिकता यामागे आहे.

संचारबंदीत लोकांनी बाहेर पडू नये म्हणून पोलिस जीवाचे रान करत आहेत. त्याचे भय कोणाला वाटत नाही. आणि गळ्यात हळकुंड बांधा म्हणजे संकट दूर होईल या धादांत खोट्या आणि निराधार अफवेवर लोक तडक विश्वास ठेवतात किंबहुना त्याची अंमलबजावणीही तेवढ्याच तातडीने करतात. रोगापेक्षाही अफवा सामाजिक स्वास्थ्यासाठी मारक आहेत. पण बुरसटलेला समाज अफवांचे अनुकरण लगेच करतो ही मानसिकता बदलायला हवी अशी जाणत्या माणसांमध्ये भावना आहे. 

अफवा पसरवणारांच्या कुंडल्या 
शासनाने आत्ता अफवा पसरवणारांच्या कुंडल्या काढल्या आहेत. त्यातील काहींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लोकांनी घरात बसून पुस्तकात वेळ घालवावा. इतरविध सकारात्मक गोष्टीसाठी घरात बसून साचलेली बौद्धिक ताकद खर्च करावी. कोरोनाच्या उच्चाटनासाठी शासन, सरकार, पोलिस, प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास झटत आहे. हजारो डॉक्‍टर, परिचारिका, परिचारक, संशोधक अपार कष्ट करत आहेत. त्यांच्या कामाला सलाम करण्यापेक्षा अफवेवर विश्वास ठेऊन गळ्यात हळकुंड बांधून आपण आपलाच विश्वासघात करत आहोत याचे भान समाजाला कधी येणार, हा प्रश्न निरूत्तर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com