दुर्गम खोऱ्यांपुढे पायपिटीचाच फेरा...

मंगळवार, 25 डिसेंबर 2018

भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष होऊनही ग्रामीण भागात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे का? असा प्रश्‍न पडण्यासारख्या स्थितीला आजही कोयना, कांदाटी, सोळशी भागांतील चिमुरड्यांना तोंड द्यावे लागत आहे. भवितव्य घडवण्यासाठी त्यांना करावी लागणारी पायपीट हे त्याचे वास्तव रूप असून, आणखी किती वर्षे अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार? हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. झाडानी मुरा या छोटेखानी गावातील चिमुरडी शिक्षणासाठी तब्बल नऊ किलोमीटरचा वळसा मारूनच संघर्षमय जीवनाचे धडे गिरवत आहेत. 

महाबळेश्वर तालुक्‍याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. जगभरातील लोक या परिसरात भटकंती करतात; पण कोयना जलाशय, कराल डोंगर आणि दाट जंगल या नैसर्गिक परिस्थितीत येथील जनजीवन अद्यापही घुटमळले असल्याचे स्पष्ट होते. २१ व्या शतकात वावरूनही या परिसराला अद्यापही स्वातंत्र्यपूर्व काळाचीच शॅडो आहे जणू.

महाबळेश्वर तालुक्‍यातील झाडाणी मुरा हे छोटेखानी गाव डोंगराच्या टोकावर दाट जंगलात वसलेलं. विकासाचा केवळ स्पर्श झाला म्हणणं इतपतच योग्य. गाव छोट असल्यानं सुविधा कितपत पोचल्या हे त्यांचं त्यांनाच ठाऊक; पण सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपली मुलं शिकली पाहिजेत, याची जाणीव येथील ग्रामस्थांना झाली; पण शाळा म्हणायची तर डोंगर माथ्यावरून सुमारे नऊ किलोमीटर अंतराचा पूर्ण डोंगर उतरून खाली असलेल्या खरोशी गावातच. 

बेफाम पाऊस अंगावर झेलत... उन्हाच्या झळा सोसत झाडाणीची चिमुरडी पिढी घनदाट जंगलातून, कड्या कपारीतून जंगलातील श्‍वापदे, रानटी जनावरे या साऱ्याची तमा न बाळगता केवळ शिक्षणासाठी नऊ किलोमीटरचा डोंगर उतरून संध्याकाळी पुन्हा चढत आहेत. 

महाबळेश्वरहून प्रतापगड मार्गे खरोशी हे अंतर ६० किलोमीटरचे आहे. शासकीय कामे अथवा इतर कामासाठी येथील लोकांना भलामोठा डोंगर पायी उतरून एवढा प्रवास करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जेमतेम बावीस मुलं. त्यापैकी चार मुलं ही झाडाणी मुरा येथून येतात. ती अनंत समस्यांना तोंड देत रोज साडेतीन तास चालून याठिकाणी येतात.

कागदावरच विकास...
शासन सर्व घटकांपर्यंत विकास पोचल्याचे जाहीर करत असले, तरी तो खरंच पोचला का? याचे हे भयान वास्तव असून, विकासाच्या आणि पुढारलेपणाच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय मंडळींकडून यावर कधी विचार होणार हा प्रश्‍नच आहे. झाडाणीसारखी गावे अजूनही विकासासाठी आर्त हाक देत असून, कागदोपत्री झालेला विकास प्रत्यक्षात केव्हा दिसणार असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत.