ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणात रस्सीखेच!

विशाल पाटील
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सातारा - केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ या मोहिमेंतर्गत गावातील स्वच्छताविषयक उपक्रम, तसेच सुविधांच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांचा ऑनलाइन अभिप्राय ‘SSG १८’ या मोबाईल ॲपद्वारे घेतला जात आहे. या पाच गुणांसाठी राज्यातील जिल्ह्यांत रस्सीखेच सुरू असून, आजपर्यंतच्या नोंदणीत नाशिक जिल्हा बाजीगर ठरला असून सातारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. 

सातारा - केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ या मोहिमेंतर्गत गावातील स्वच्छताविषयक उपक्रम, तसेच सुविधांच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांचा ऑनलाइन अभिप्राय ‘SSG १८’ या मोबाईल ॲपद्वारे घेतला जात आहे. या पाच गुणांसाठी राज्यातील जिल्ह्यांत रस्सीखेच सुरू असून, आजपर्यंतच्या नोंदणीत नाशिक जिल्हा बाजीगर ठरला असून सातारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. 

संपूर्ण देशभरात ता. एक ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- २०१८’ ही मोहीम राबविली जात आहे. त्या अंतर्गत गावामधील सार्वजनिक ठिकाणांचे स्वच्छता निरीक्षण, ग्रामस्थांचा स्वच्छताविषयक ऑनलाइन अभिप्राय आणि स्वच्छताविषयक सद्यःस्थिती अशा तीन स्वरूपांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १०० गुण असणार आहेत. सर्वाधिक गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत,  तसेच जिल्ह्यांचा गौरव येत्या दोन ऑक्‍टोबरला राष्ट्रीय पातळीवर केला जाणार आहे. 

ग्रामपंचायतींच्या तपासणीसाठी राज्य शासनातर्फे एका संस्थेची निवड करून त्यांच्या गुणप्रक्रिया निश्‍चित करण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणात लोकसहभाग महत्त्वाचा असून, त्यासाठी ऑनलाइन प्रतिसाद देण्यास पाच गुण दिले आहेत. जिल्ह्यातील पाच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कुटुंबीयांनी प्रतिसाद दिल्यास पाच गुण, तीन ते पाच टक्‍के प्रतिसादास तीन गुण, एक ते तीन टक्‍के कुटुंबीयांनी प्रतिसाद दिल्यास एक व एक टक्‍क्‍यापेक्षा कमी असल्यास शून्य गुण मिळेल. सध्या नाशिकने तब्बल दहा टक्‍के प्रतिसाद मिळविला आहे. त्यापाठोपाठ सोलापूरने ८.३ टक्‍के, तर साताऱ्याने तीन टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. यवतमाळ अवघे ०.१ टक्‍क्‍यांवर सर्वात खाली आहे. शौचालयांची उपलब्धता, वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्‍त पडताळणीत पुढे असलेल्या साताऱ्याला देशात बाजी मारण्यासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. 

...अशी आहे प्रश्नावली
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणबद्दल माहिती आहे का?, एसबीएमच्या अंमलबजावणीसह तुमच्या गावातील सर्वसाधारण स्वच्छतेत किती सुधारणा झालेली आहे?, घनकचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी गावपातळीवर व्यवस्था केली आहे का?, ओला कचऱ्यासाठी (दूषित पाण्यासाठी) गावपातळीवर व्यवस्था आहे का? अशी प्रश्‍नावली आहे.

...असे असेल गुणांकन
 सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण- ३० गुण
 नागरिक, मुख्य प्रभावी व्यक्तीची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्राय- ३५ गुण
 स्वच्छताविषयक सद्य:स्थिती- ३५ गुण

Web Title: rural cleaning survey campaign