शवविच्छेदनाच्या गैरसोयीमुळे ससेहोलपट

महेश बारटक्के
शनिवार, 14 जुलै 2018

कुडाळ - मेढा ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टर उपलब्ध असूनसुद्धा शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला मृतदेह तब्बल तीन तास ताटकळत ठेवत शवविच्छेदन करण्यात टाळाटाळ करणाऱ्या डॉ. चंद्रकांत यादव यांच्यावर तत्काळ कारवाई करून आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य सौरभ शिंदे यांच्यासह कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे.

कुडाळ - मेढा ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टर उपलब्ध असूनसुद्धा शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला मृतदेह तब्बल तीन तास ताटकळत ठेवत शवविच्छेदन करण्यात टाळाटाळ करणाऱ्या डॉ. चंद्रकांत यादव यांच्यावर तत्काळ कारवाई करून आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य सौरभ शिंदे यांच्यासह कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे.

दहावीत उत्तीर्ण होऊनही कमी गुण मिळाल्यामुळे येथील ज्योती पवार या युवतीने आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. मात्र, तिथे शवविच्छेदनाची सोय नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रासकर यांनी मेढा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांना पाठविले. तेथे उपस्थित डॉ. यादव हे जेवणासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क झाल्यांनतर त्यांनी मला ‘कोर्ट कॉल’ आहे, असे सांगत सरळ सरळ येण्यास नकार दिला तसेच कुडाळ येथील संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्ही शवविच्छेदन करून घ्या असेही सांगितले. नातेवाईकांनी डॉ. यादव यांना शवविच्छेदन करण्याची विनंती केली. मात्र, किचिंतही पाझर न फुटलेल्या डॉ. यादव यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देत शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करून नातेवाईकांशी हुज्जत घातली व तब्बल तीन तास मृतदेह ताटकळत ठेवला.

त्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या नातेवाईकांनी पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. श्री. शिंदे यांनी तत्काळ सातारा येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे डॉ. यादव यांची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठांकडून कानउघडणी झाल्यानंतर डॉ. यादव यांनी शवविच्छेदन केले. या सर्व प्रकारामुळे ज्योती पवार हिच्या नातेवाईकांसह कुडाळ ग्रामस्थांनी डॉ. यादव यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

जावळी तालुक्‍यातील कुडाळ हे सर्वांत जास्त लोकसंख्या असणारे ठिकाण असून, अनेकवेळा असे प्रसंग उद्‌भवतात आणि शवविच्छेदनासाठी अनेकांना रात्री-अपरात्री मेढा येथे धावाधाव करावी लागते. तेथील परिस्थितीनुसार तासन्‌ तास तिष्ठतही बसावे लागते. तेव्हा कुडाळ किंवा सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी वारंवार जनतेतून मागणी करण्यात आली असूनसुद्धा आरोग्य विभागाकडून याकडे डोळेझाक होत आहे. ज्योती पवार हिच्या मृत्यूनंतर ही मागणी पुन्हा जोर धरू लागली असून, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे जावळीतील असल्याने त्यांनी तरी याची दखल घेऊन तत्काळ या भागातील जनतेची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

मृत्यूनंतर मृतदेहाची अवहेलना करणाऱ्या डॉ. यादव यांच्यावर तत्काळ कारवाई करून आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा व्हावी, यासाठी लेखी पत्राद्वारे वरिष्ठांकडे मागणी केली असून, कुडाळ किंवा सोमर्डी या ठिकाणी शवविच्छेदनाची पर्यायी व्यवस्था सुरू करावी, यासाठी आग्रही भूमिका घेऊन पाठपुरवा करणार आहे.
- सौरभ शिंदे, सदस्य, पंचायत समिती, मेढा

Web Title: rural hospital Autopsy disadvantage