ग्रामीण रुग्णालयाचा खासगीतून कारभार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

सातारा - दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार औंध येथील खासगी रुग्णालयातून होत असल्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील सावळा गोंधळ समोर आला असून, जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या कारभाराचे पितळही उघडे पडले आहे.

सातारा - दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार औंध येथील खासगी रुग्णालयातून होत असल्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील सावळा गोंधळ समोर आला असून, जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या कारभाराचे पितळही उघडे पडले आहे.

शासकीय रुग्णालयाचा वापर तेथे येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये पळवापळवीसाठी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होतो. संबंधित वैद्यकीय अधिकारी ज्या खासगी रुग्णालयात प्रॅक्‍टीस करतो तिकडे रुग्ण पाठविण्याचे उद्योग होत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी शासनाने वेतनाच्या ३५ टक्के जादा रक्कम व्यवसाय प्रतिरोध भत्ता देऊन शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी प्रॅक्‍टीसला बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतर अनेकांनी अशी प्रॅक्‍टीस बंद केली. मात्र, काही जणांना ही बंदी रुचली नाही. शासकीय नोकरीबरोबरच खासगी प्रॅक्‍टीसही अनेक ठिकाणी सर्रास सुरू आहे. त्यावर जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे नियंत्रण नाही. किंबहुना त्यांच्याच आशीर्वादावर असे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जातो. असाच एक प्रकार समोर आला आहे. या बाबत दहिवडी ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

औंध ग्रामीण रुग्णालयातील डॉ. व्ही. बी. साळुंखे यांच्याकडे दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचाही अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. मात्र, या पदभाराचे काम रुग्णालयात न येताच होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ते दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात आठ जून २०१५ रोजी हजर झाले. मात्र, ते हजर होण्यापूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सकांचा आदेश आला होता. त्यामध्ये त्यांना औंध येथे कामकाज करण्यास सांगण्यात आले. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रतिनियुक्ती आदेश रद्द होऊनही ते तेथेच काम करत होते. एकच कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी सेवा बजावता येत नाही. मात्र, डॉ. साळुंखे हे ११ वर्षे औंध ग्रामीण रुग्णालयातच कार्यरत आहेत, असा आक्षेप अर्जात घेण्यात आला आहे.

दरम्यान, १३ जून २०१८ रोजी त्यांच्याकडे दहिवडी येथील वैद्यकीय अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. मात्र, तेव्हापासूनही ते दहिवडी येथे आले नाहीत. शासकीय कामासंबंधातील दप्तर आणि टपाल हे औंधवरून जावून-येऊन काम करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यामार्फत औंध येथील श्री यमाई हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दिले जात आहे.

शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयात व्यवसाय करण्यास प्रतिबंध आहे. त्यासाठी वेतनाच्या ३५ टक्के व्यवसाय प्रतिरोध भत्ता म्हणून दिला जातो. असे असतानाही श्री यमाई हॉस्पिटलमध्ये ते खासगी व्यवसाय करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. औंध ग्रामीण रुग्णालयात कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या प्रसूती या प्रत्यक्षात खासगी दवाखान्यात केलेल्या असल्याचा गंभीर आरोपही त्यात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार सुरू आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या, उपोषण झाले तरीही यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करून त्यांच्यावर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यातील काही ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी प्रॅक्‍टीस सुरू आहे. त्यावरही या निमित्ताने कारवाई होणे आवश्‍यक आहे.

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या या अर्जाची माहिती काल सकाळी समजली आहे. याबाबत प्रत्यक्ष जाऊन चौकशी करण्याचे निर्देश निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. चौकशीत समोर येणाऱ्या तथ्यांनुसार कारवाई करण्यात येईल तसेच दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचे काम त्याच ठिकाणी चालेल, याबाबतची सूचना देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी सांगितले.

Web Title: rural hospital private work