PHOTOS : ऊस फडात सापडली मांजराची 'ही' दुर्मिळ प्रजाती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

रानमांजराच्या दुर्मिळ प्रजातीपैकी रस्टी स्पॉटेड कॅट अर्थात वाघाटी आहे. वाघासारखी कातडी असलेले हे मांजर अलीकडे फारसे कधी दिसलेले नाही. गुरुवारी सकाळी अभय वाडीकर यांच्या उसाच्या फडात तोड सुरू असताना हे पिल्लू आढळले.

सांगली - कवठे एकंद (ता. तासगाव) येथील ऊस फडात मांजराच्या दुर्मिळ प्रजातीतील रस्टी स्पॉटेड कॅट (वाघाटी) जातीचे पिल्लू काल आढळले. शेतकरी, प्राणिमित्र आणि वन विभागाने त्या पिलाला पुन्हा तिच्या आईकडे सोपवण्यासाठी काल रात्रभर जागरण केले. रात्री साडेबाराच्या  सुमारास ती मांजरी आली आणि तिने अलगद पिलाला उचलून नेले आणि प्राणिमित्रांच्या प्रयत्नांना यश आले.

याबाबतची अधिक माहिती अशी - रानमांजराच्या दुर्मिळ प्रजातीपैकी रस्टी स्पॉटेड कॅट अर्थात वाघाटी आहे. वाघासारखी कातडी असलेले हे मांजर अलीकडे फारसे कधी दिसलेले नाही. गुरुवारी सकाळी अभय वाडीकर यांच्या उसाच्या फडात तोड सुरू असताना हे पिल्लू आढळले. सुदैवाने ही माहिती प्रा. शशिकांत दामटे यांना समजली. त्यांनी प्राणिमित्र अजित काशीद यांना कळवले. त्यांनी वनविभागाला कळवताच ॲनिमल राहतचे किरण नाईक, कौस्तुभ पोळ यांनी टीमसह ऊस फडाकडे धाव घेतली. ओंजळीत बसेल एवढे हे पिल्लू सुदृढ अवस्थेत होते.

मांजरे रात्रीच अधिक कार्यप्रवण

या पिलाला पुन्हा त्याच्या आईच्या स्वाधीन केले तरच ते जगेल. त्यामुळे ऊस फड न पेटवता त्याच्या आईची वाट पहायचा निर्णय सर्वांनी घेतला. मांजरे रात्रीच अधिक कार्यप्रवण असतात. त्यामुळे मांजरी रात्री पिलाच्या शोधात येईल याची सर्वांना खात्री होती. तसेच झाले. सायंकाळी सहा नंतर सर्वजण पिलाला खोक्‍यामध्ये ठेवून आजूबाजूला दबा धरून बसले होते. पिलाच्या आवाजामुळे कुत्री आणि नेहमीची मांजरेही सावध झाली. त्यामुळे त्यांच्यापासून पिलाचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे होते. रात्री साडेबाराच्या सुमारास खोक्‍याजवळ हालचाल झाली. बॅटरीचा प्रकाश टाकला असता पिलाला घेऊन जाणारी वाघाटी मांजरी दिसली. प्राणिमित्र कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 

वाघाटी विषयी

मार्जार कुळातील वाघाटीला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. पट्टेरी वाघाप्रमाणे त्याची त्वचा असते. १४ ते १७ इंच  रुंदीचे सुमारे दीड किलो वजनाचे हे मांजर असते. त्याचा प्रजनन कालावधी साधारण सत्तर दिवसांचा असतो. मांसभक्षी हा प्राणी निशाचर आहे. त्याच्या जपणुकीसाठी गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. 

प्राणी - पिल्ली आढळल्यास करा संपर्क १९२६ टोल फ्रीवर

सध्या ऊसतोडीचे दिवस आहेत. या काळात मुंगूस, ससे, मांजरे, ससे, लांडगे, कोल्हे आदींची पिल्ली आढळण्याची दाट शक्‍यता असते. भीतीपोटी बऱ्याचदा ऊसतोड मजुरांकडून त्यांची हत्या होते. ऊस फड पेटवून दिल्यानेही या प्राण्यांवर सक्रांत येते. आपल्या आजूबाजूच्या प्राणी - पक्षांचे जगणे  आपल्या जगण्यासाठी गरजेचे आहे याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. शेतकरी आणि ऊसतोड मजुरांनी याबाबत काळजी घेऊन कोणतेही प्राणी - पिल्ली आढळल्यास तत्काळ १९२६ या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधावा.
- किरण नाईक, ॲनिमल राहत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rusty Spotted Cat Vaghati Found In Kavathe Ekand Sangli