खंबाटकीतील "एस' वळण लवकरच काढून टाकणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

खंडाळा - पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक "एस' वळण काढून टाकण्याबरोबरच घाटात प्रस्तावित असलेल्या 750 कोटी रुपये खर्चाच्या दोन बोगद्यांची कामे लवकरच मार्गी लागतील, अशी माहिती आज सूत्रांनी दिली. या घाटातील अपघातग्रस्त स्थळाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील पथकाने भेट देऊन पाहणी केली. अपघात टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना मार्गी लागेपर्यंत करावयाच्या तात्पुरत्या योजनांची माहितीही या पथकाने दिली. 

घाटातील "एस' वळण, तीव्र उतार व खंबाटकी बोगद्याची पाहणी या पथकाने केली. बोगदा संपल्यानंतर ते जुन्या टोलनाक्‍यापर्यंत सध्या फक्त रस्त्याच्या एका बाजूला दिशादर्शक फलक आहेत. वाहनचालकांना ते स्पष्ट दिसत नाहीत म्हणून ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावावेत, असेही या तज्ज्ञांनी सुचविले. दहा एप्रिल रोजी झालेल्या अपघातातील टेम्पो रस्त्याच्या लगतच असणाऱ्या सिमेंट कठड्यावर आदळला होता. म्हणून सध्या बांधकाम सुरू असणारी संरक्षक भिंत महामार्गापासून थोडे अंतर सोडून बांधावी, बोगद्यापासून "एस' वळणापर्यंत सूचना फलकांची संख्या वाढवावी, अशा तात्पुरत्या उपाययोजना या पथकाने सुचविल्या. 

महामार्ग पोलिस अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक (वाहतूक) शेळके, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत पोतदार, तहसीलदार विवेक जाधव, रिलायन्सचे जे. के. सिंग, सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे आदी उपस्थित होते. 

Web Title: S turn in Khambatki ghat will soon be removed