#SaathChal बाप-आई माझी विठ्ठल रखुमाई!

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 13 जुलै 2018

‘विसरू नको रे आई-बापाला झिजविली त्यांनी काया...’ ही शिकवण मनामनांत पेरत आता वारकऱ्यांना पंढरपूरचे वेध लागले आहेत. मुख्य सोहळ्यातून काही वारकरी अगोदरच वारीत सहभागी झाले असून आता जिल्ह्यातूनही पायी दिंड्या रवाना होऊ लागल्या आहेत. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आईला, वडिलांना किंवा दोघांनाही वारी घडवून आणणाऱ्या वारकऱ्यांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्यांच्या या पंढरीच्या वारीविषयी आजपासून...

कोल्हापूर - दादा आणि आईची गेल्या चाळीस वर्षांत कधीच वारी चुकली नाही... दादांचं वय चौऱ्यांशी तर आई पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावरची... त्यामुळे घरात लहानपणापासून विठ्ठलभक्तीचे संस्कार... पूर्वीपासून आषाढीला पंढरपूरला येतोच. 

तीन वर्षांपासून ठरवलं, आता दादा आणि आईची वारी प्रत्येक वर्षी आपण घडवून आणायची... यंदाही सोहळ्यात सहभागी झालो आहे आणि विठ्ठलनामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचतो आहे. प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील शिवाजी पाटील थेट वारीतून भरभरून बोलत होते... 

पाटील कुटुंब म्हणजे मुख्य व्यवसाय शेतीच. विठ्ठलनामाचा अखंड गजर करणाऱ्या शिवाजी यांनी पंधरा वर्षांपूर्वी विनोदी चित्रपटांची लाट असताना ‘राजा पंढरीचा’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट गाजलाही. मात्र ते चित्रपट काढताहेत, याची पुसटशीही कल्पना निम्म्याहून अधिक चित्रीकरण होईपर्यंत घरच्यांना नव्हती. याच चित्रपटाने विठ्ठल भक्तिगीतांची उंची आणखी वाढवली. ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’ हे गाणं हिट झालं. शब्दप्रभू जगदीश खेबूडकर यांनी चित्रपटासाठी गीते लिहिली होती. विठूरायाची महती सांगणारा ‘चंद्रभागा’ हा त्यांचा चित्रपटही नुकताच रसिकांच्या भेटीला येऊन गेला. 

शिवाजी पाटील सांगतात, ‘‘दादांची ही चाळीसावी वारी. वारी सुरू करताना त्यांनी आपल्यासोबत मित्र आणि पै-पाहुण्यांचा गोतावळा पहिल्यापासून घेतला. त्यातील बहुतांश मंडळींची वारी आजपर्यंत कधीच चुकली नाही. दादा तर आजारी असले तरी वारीवेळी त्यांच्यात अशी काही ऊर्जा सळसळते की ते वारी यशस्वी करूनच घरी परत यायचे. आज त्यांच्याबरोबर वारी करतानाही तोच अनुभव घेतो आहे.’’ 

दादा आणि आईची वारी घडवताना त्यांची विशेष काळजी घेतो. अर्थात त्यांना फारसं ते आवडत नसले तरी मुलगा म्हणून ती माझी जबाबदारीच आहे आणि शेवटी माझा विठोबा तरी काय सांगतो? तो हेच सांगतो...‘‘बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई...!’’
- शिवाजी पाटील  

Web Title: #SaathChal special story for pandharichi wari