#SaathChal मुलींसह नानांची अठ्ठाविसावी वारी..!

संभाजी गंडमाळे  
बुधवार, 18 जुलै 2018

कोल्हापूर - मी वारकरी. गेली अठ्ठावीस वर्षे पायी वारी करतो. केवळ स्वतः वारी केली की झालं, असा केवळ वैयक्तिक विचार न करता जितके लोक बरोबर येतील त्यांना घेऊन वारी करण्यातला आनंद फार मोठा मानतो. माझ्या दोन्ही मुली तर सलग पंचवीस वर्षे माझ्याबरोबर वारी करतात आणि यंदाही त्या तितक्‍याच उत्साहाने वारीत तल्लीन झाल्या आहेत... ज्ञानदेव ऊर्फ नाना पाटील भरभरून बोलत होते. 

कोल्हापूरचा वारकरी संप्रदाय आणि नाना पाटील हे एक अतूट समीकरण. केवळ शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातही त्यांचा वारकऱ्यांचा गोतावळा मोठा. भजन असो कीर्तन, प्रवचन किंवा हरिनाम पारायण सोहळे असोत, या साऱ्या गोष्टींची त्यांच्याकडे इत्यंभूत माहिती. वारीची तयारी त्यांच्याकडे किमान दोन महिने अगोदरपासूनच तयार होते. नव्याने पायी वारी सुरू करणाऱ्यांनाही ते तितक्‍याच आत्मीयतेने मार्गदर्शन करतात. वारीला जाताना बरोबर काय असावं, काय नको, रोजचा प्रवास किती करायचा आणि विसाव्याची ठिकाणे कशी असावीत, असे सारे नियोजन ते नव्या लोकांना समजावून सांगतात. यंदाही त्यांच्याबरोबर दोनशेहून अधिक विठ्ठलभक्त वारीत सहभागी झाले आहेत. ते सांगतात, ""एकशे पस्तीसहून अधिक वर्षे सातत्याने भागवत धर्माची पताका घेऊन मानवतेच्या, धर्मनिरपेक्षतेचा प्रचार व प्रसाराचे काम ज्येष्ठांनी केले. ते आम्ही पुढेही सुरू ठेवले आहे. अलीकडच्या काळात विशेषतः तरुणाई अधिक मोठ्या संख्येने वारीत सहभागी होत आहे. आमच्यादृष्टीने ही अतिशय सकारात्मक गोष्ट असून, ही मंडळीच पुढे ही परंपरा आणखी नेटाने सुरू ठेवणार आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर "प्लॅनिंग' कसं असतं, "टाईम मॅनेजमेंट' कसं असतं इथपासून ते "टीम स्पिरिट'पर्यंत साऱ्या गोष्टी त्यांना वारीत शिकायला मिळतात.'' 

घरची वारकरी परंपरा आमच्या पिढीने नेटाने पुढे सुरू ठेवली आहे. दोन्ही मुलींबरोबरची वारी माझ्यासाठी नक्कीच एक वेगळा अनुभव असतो. 
- नाना पाटील 

Web Title: #SaathChal Wari with daughters