#SaathChal दिंड्या चालल्या पंढरपुरी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सातारा - टाळ-मृदंगाच्या गजरात अन्‌ पताका फडकावत आषाढी वारीसाठी सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील वारकरी दिंड्या लोणंद, पंढरपूरकडे मार्गस्थ होऊ लागल्या असून, अनेक गावांनी वारीची परंपरा निष्ठेने जोपासली आहे. 

सातारा - टाळ-मृदंगाच्या गजरात अन्‌ पताका फडकावत आषाढी वारीसाठी सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील वारकरी दिंड्या लोणंद, पंढरपूरकडे मार्गस्थ होऊ लागल्या असून, अनेक गावांनी वारीची परंपरा निष्ठेने जोपासली आहे. 

जिल्ह्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे. बहुतेक गावांतील वारकरी आषाढी-कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जातातच. प्राधान्याने अनेक वारकरी आषाढी वारी करण्यास पूर्वीपासून प्राधान्य देतात. साधारण जून- जुलैमध्ये येणारी ही वारी शेतकऱ्यांसाठी सोईची असते. वारीदरम्यान शेतातील पेरण्यांची कामे बहुतांश उरकलेली असतात आणि पिके भांगलणीस येईपर्यंत शेतीत फारसे काम नसते. जिल्ह्यातील अनेक गावांच्या स्वतंत्र दिंड्या आहेत. तर काही भागांमध्ये विविध गावांतील वारकरी एकत्र येऊन दिंडीचे नियोजन करतात.

सातारा जिल्ह्यातील अनेक दिंड्या ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा जिल्ह्यात लोणंद येथे आला की त्यात सहभागी होतात. तर काही दिंड्या कडेगाव, विटा, मायणीमार्गे पंढरपूरकडे जातात. जिल्ह्यात पालखी सोहळा येण्यापूर्वी तीन ते चार दिवस दिंड्या गावागावांतून निघण्यास प्रारंभ होतो. गावातील सुहासिनी सर्व वारकऱ्यांचे औक्षण करतात आणि अव्याहत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी मार्गस्थ होते. कऱ्हाड, पाटण, जावळी भागातील 

दिंड्या कालपासून मार्गक्रमण करू लागल्या आहेत. सुकाळ असो नाही तर दुष्काळ ठराविक दिंड्या दरवर्षी निघतातच. काही छोट्या दिंड्यांनाही ५० ते ७५ वर्षांची परंपरा आहे. आषाढी पायी वारी सोहळ्यात कऱ्हाड तालुक्‍यातील तांबवे, कोळे, वसंतगड, आरेवाडी या विभागांच्या दिंड्यांतही शेकडो भाविक तन, मन, धन अर्पूण सहभागी होतात. 

मानाची दिंडी
कऱ्हाडलाही वारकरी सांप्रदायाची अखंड परंपरा आहे. संत सखुबाई यांच्यासारख्या महान संतांचा वारसा त्याला लाभला आहे. येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर यांच्या मुख्य दिंडीसह तालुक्‍यातील विविध गावांच्या दिंड्यांची १५० वर्षांपासून पंढरपुरात ख्याती आहे. या मानाच्या दिंडीने श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात १०० वर्षांपूर्वी पालखीपुढे १२ व्या क्रमांकाचा मानही मिळविला आहे. या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना विसावण्यासाठी पंढरपूर, आळंदी व कऱ्हाड येथे मठही बांधण्यात आले आहेत.

बोधे दिंडीला दीडशे वर्षांची परंपरा
सातारकर बोधे दिंडीला दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. (कै.) केशवराव बोधे यांनी ही दिंडी १८६४ मध्ये सुरू केली. त्यांचे वंशज ज्ञानेश आणि चैतन्य हे दिंडी पुढे चालवीत आहेत. जिल्ह्यातील अनेक दिंड्या लोणंद येथे मुख्य ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात मिसळतात. ही दिंडी वाखरी येथे मुख्य वारीत सहभागी होते. कोरेगाव, पुसेगाव, म्हसवड, पिलीवमार्गे वाखरी येथे जाते.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Dindi Pandharpur